मुंबईतलं आलिशान घर 11 वर्षापासून रिकामं, भाडे फक्त 64 रुपये
By ऑनलाइन लोकमत | Published: March 29, 2019 04:13 PM2019-03-29T16:13:12+5:302019-03-29T17:10:43+5:30
मात्र ताडदेव जवळील 800 स्क्वेअर फूट फ्लॅट गेल्या 11 वर्षापासून रिकामं आहे. या फ्लॅटचं भाडे 64 रुपये महिना आहे
मुंबई - रोजच्या धकाधकीत जीवनात निवांत क्षणाचा आसरा घेण्यासाठी मुंबईकरघराचे स्वप्न पाहत असतो. मुंबईतल्या घरांच्या किंमती गगनाला भिडल्या आहेत. घर खरेदी करणे असो वा भाड्याने घेणे मुंबईकरांना खिशा रिकामा करावा लागतो. दक्षिण मुंबईत घर असणे सर्वांचे स्वप्न असते. मात्र ताडदेव जवळील 800 स्क्वेअर फूट फ्लॅट गेल्या 11 वर्षापासून खाली आहे. या फ्लॅटचं भाडे महिन्याला 64 रुपये आहे मात्र एका अटीमुळे हे घरं 11 वर्षापासून रिकामे आहे. त्यात कोणीही राहायला आलेलं नाही.
दक्षिण मुंबईतील ताडदेव येथे धनुजीबॉय बिल्डींगमध्ये पारसी समुदायाकडून मुंबई पोलिसांमधील पारसी अधिकाऱ्याला हा फ्लॅट देऊ केला होता. पारसी ट्रस्ट आणि डी महालक्ष्मीवाला चॅरिटी संस्थेकडे या फ्लॅटची जबाबदारी आहे. या ट्रस्टने मुंबई पोलिसांशी केलेल्या करारामुळे सध्या हा फ्लॅट रिकामा आहे. हा फ्लॅट केवळ पारसी समुदायातील व्यक्तीला देण्यात येईल असा करार करण्यात आला. आतापर्यंत फक्त एकच पारसी अधिकारी या ठिकाणी राहत होते. सहाय्यक पोलीस आयुक्त फिरोज गंजिया हे 2008 पर्यंत या फ्लॅटमध्ये वास्तव्यास होते. मात्र 2008 पासून आजतागायत हा फ्लॅट रिकामा आहे.
मुंबई पोलीस दलात सध्या 2 पारसी अधिकारी
सहपोलीस आयुक्त संतोष रस्तोगी यांनी सांगितल्यानुसार मुंबई पोलीस दलात दोन पारसी अधिकारी कार्यरत आहेत. त्यातील एक मुंबईच्या बाहेर कार्यरत आहेत तर दुसऱ्या अधिकाऱ्याचा मुंबईत स्वत:चा फ्लॅट आहे. ज्यांनी या फ्लॅटमध्ये येण्यास नकार दिला आहे. त्यामुळे आम्ही हा फ्लॅट पुन्हा ट्रस्टला देण्याचा निर्णय घेतला आहे.
मुंबई पोलीस दलातील अनेक कर्मचाऱ्यांनी हा फ्लॅट आपल्याला मिळावा यासाठी अर्ज केलेला आहे. मात्र पारसी ट्रस्टने घातलेल्या अटीमुळे हा फ्लॅट कोणालाही देण्यात आला नाही.