Join us

...म्हणून दक्षिण मुंबईची जागा लढवली नाही; मनसे नेते बाळा नांदगावकर यांचा खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 09, 2024 7:36 AM

Loksabha Election - दक्षिण मुंबईतील महायुतीचे उमेदवार यामिनी जाधव यांच्या प्रचारासाठी मनसेकडून मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होते. 

मुंबई - Bala Nandgoankar ( Marathi News ) पक्षाचा निर्णय झाल्यावर उमेदवार कोण हा विचार करून चालत नाही. पक्षाचा निर्णय हा अंतिम असतो. सक्षम आणि कणखर नेतृत्व या देशाला लाभलं पाहिजे यासाठी नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान बनावेत यासाठी पक्षाने बिनशर्त पाठिंबा महायुतीला दिलेला आहे. त्यामुळे दक्षिण मुंबईतून मी निवडणूक लढवण्याचा विषयच येत नाही असा खुलासा मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी केला.

मनसे नेते बाळा नांदगावकर म्हणाले की, महायुतीच्या उमेदवाराच्या विजयासाठी मनसेनं कंबर कसली आहे. जागा कुणाला द्यायची हा निर्णय होता. मनसेला जागा देण्यास महायुती तयार होती. परंतु त्यांच्या चिन्हावर निवडणूक लढा असं त्यांचं म्हणणं होते. मात्र त्यांच्या चिन्हावर लढणं हे आम्हाला योग्य वाटलं नाही. १८ वर्ष मनसेच्या कार्यकर्त्यांनी मेहनतीवर चिन्ह कमावलं आहे. त्यामुळे ती निशाणी सोडून दुसऱ्या चिन्हावर लढवणं हा एकप्रकारे कार्यकर्त्यांचा अवमान केला असं होता कामा नये. त्यामुळे फार विचार करून हा निर्णय घेतला असं त्यांनी म्हटलं.

तसेच मनसे कार्यकर्ते जीवापाड मेहनत घेत असतात, लोकसभेनंतर काही महिन्यात विधानसभा आहेत. उमेदवार कोण असावा हे पक्ष ठरवेल. कार्यकर्ता हा रस्त्यावर काम करत असतो. दक्षिण मुंबईत अजूनही जुन्या चाळीचा प्रश्न सुटला नाही. कित्येक झोपडपट्ट्या आजही विकसित झाल्या नाहीत. रेरा कायदा आणल्याने विकासकांवर नियंत्रण आले आहे. दक्षिण मुंबईत गरिबातला गरिब आणि श्रीमंतांपैकी श्रीमंत माणसं राहतात. प्रत्येकाचे प्रश्न वेगळे आहे. दक्षिण मुंबईत वाहतूक कोंडीचा मोठा प्रश्न आहे. पण अटल सेतू, कोस्टल रोडसारखे प्रकल्प येतायेत असंही बाळा नांदगावकर यांनी सांगितले. 

दरम्यान, प्रत्येक उमेदवाराला प्रचार करण्याचा अधिकार आहे. तो अधिकार कुणी हिरावू शकत नाही. सबका साथ, सबका विकास या सूत्राने नरेंद्र मोदी पुढे जात आहेत. त्यामुळे मराठी गुजराती असा वाद न घातला लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी थोडी सॉफ्ट भूमिका घेतली पाहिजे. जर कुणी कठोर भूमिका घेत असेल तर आम्हालाही कठोरपणे वागावे लागेल असा सूचक इशाराही मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी दिला. 

टॅग्स :बाळा नांदगावकरमनसेमहायुतीमुंबई दक्षिणलोकसभा निवडणूक २०२४महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४