मातोश्रीवर कशाला, आम्हीच तुमच्याकडे येतो; शाखा संवादातून आदित्य ठाकरेंची हाक
By ऑनलाइन लोकमत | Published: April 22, 2024 09:54 AM2024-04-22T09:54:31+5:302024-04-22T09:55:20+5:30
ठाकरे हे सैनिकांना दुर्मीळ असतात, असे वाटणाऱ्यांना ठाकरे सहज भेटू लागल्याचे चित्र मुंबईत पाहावयास मिळत आहे.
मुंबई : एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेचे आमदार, खासदार आणि काही नेत्यांनी केलेली बंडखोरी आणि संघटना राखण्याचे आव्हान, यासाठी कठोर परीक्षा म्हणून समोर असलेल्या निवडणुका पाहून उद्धवसेनेने ‘शाखा संवाद’ हा उपक्रम हाती घेतला आहे.
एरवी मातोश्रीवर जावे लागणाऱ्या सैनिकांना आता आदित्य ठाकरे भेटीसाठी थेट उपलब्ध होऊ लागल्याने या भेटीगाठीची चर्चा सुरू झाली आहे.
मुंबई दक्षिण लोकसभा मतदारसंघाचे उदाहरण घ्यायचे झाले तर, येथील ३० पेक्षा अधिक शाखा संवादाचे वेळापत्रक तयार केले आहे. तिथे नियोजित वेळापत्रकानुसार शाखांना भेट घेण्याची काळजी आदित्य घेत आहेत. ठाकरे हे सैनिकांना दुर्मीळ असतात, असे वाटणाऱ्यांना ठाकरे सहज भेटू लागल्याचे चित्र मुंबईत पाहावयास मिळत आहे.
शाखा प्रमुखांची धावपळ
मुंबईत निवडणूक प्रभागनिहाय एक शाखाप्रमुख आहे. या शाखांमध्ये जाऊन आदित्य निवडणूक तयारीचा आढावा घेण्याबरोबरच प्रचाराची दिशा काय असावी यावर कार्यकर्त्यांशी चर्चा करून मार्गदर्शन करतात. पक्षाचे प्रमुख नेतेच आपल्या शाखेत येऊन बैठका घेत असल्यामुळे हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी शाखा प्रमुखांची धावपळ सुरू आहे.
जनतेला आवाहन
गीतानगरमध्ये अरविंद सावंत यांच्यासाठी ठाकरे यांनी शाखा संवादांतर्गत प्रचारसभा घेतली. मतदान कोणाला करायचे हे जनतेने ठरवावे. भाजपला संविधान बदलण्यासाठी ४०० पार हवे असल्याचा आरोप त्यांनी केला.
केवळ कार्यकर्त्यामध्येच नाही तर सर्व सामान्य नागरिकांनासु्द्धा या कार्यक्रमाबद्दल औत्सुक्य असते. प्रत्येक शाखा संवादाला मिळणारा प्रतिसाद हा अभूतपूर्व आहे. विशेष म्हणजे सर्व थरातील नागरिक या प्रचार सभांना उत्साहाने हजेरी लावतात.- सिद्धेश माणगावकर, शाखाप्रमुख ताडदेव.