दक्षिण मुंबईतील रस्ते दुरुस्ती रखडणार; ठेकेदारांकडून १२ टक्के अधिक बोली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 18, 2018 01:56 AM2018-11-18T01:56:06+5:302018-11-18T01:56:33+5:30
रस्ते दुरुस्तीच्या कामामध्ये ठेकेदारांनी अंदाजित खर्चापेक्षा तब्बल १२ टक्के जादा बोली लावली आहे. यामुळे जादा बोली असलेल्या या निविदा महापालिका प्रशासनाने तत्काळ रद्द केल्या आहेत.
मुंबई : रस्ते दुरुस्तीच्या कामामध्ये ठेकेदारांनी अंदाजित खर्चापेक्षा तब्बल १२ टक्के जादा बोली लावली आहे. यामुळे जादा बोली असलेल्या या निविदा महापालिका प्रशासनाने तत्काळ रद्द केल्या आहेत. या कामांसाठी आता पुनर्निविदा मागविण्यात आल्या आहेत. मात्र, याचा फटका दक्षिण मुंबईतील रस्ते दुरुस्तीला बसणार आहे.
तीन वर्षांपूर्वी रस्ते घोटाळा उघड झाल्यानंतर महापालिकेने रस्त्यांच्या कामांना कात्री लावली. ठेकेदारांच्या कामाबाबत साशंकता असल्याने रस्त्यांची अनेक कामे लांबणीवर पडली होती. मात्र, या वर्षी महापालिकेने तब्बल एक हजार रस्त्यांची कामे टप्प्याटप्प्याने हाती घेतली आहेत.
हाती घेण्यात आलेल्या या कामाअंतर्गत दक्षिण मुंबईतील विवध ठिकाणांची कामे होणार आहेत. सुमारे ३१ कोटींचे रस्ते दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आली असल्याचे समोर आले आहे.
मात्र, यासाठी मागविलेल्या निविदांमध्ये दोन ठेकेदारांनी ३१ कोटींच्या कामाचा खर्च १२ टक्के अधिक दाखविला आहे. अंदाजित खर्चापेक्षा ठेकेदाराने जादा बोली लावण्याची ही पहिलीच वेळ नाही. या कामांसाठी साधारणत: पाच टक्के कमी किंवा आठ टक्के अधिक बोली लावली जाते. त्यामुळे या निविदा रद्द करून मुंबई महापालिकेने या कामासाठी पुनर्निविदा मागविल्या असल्याचे सूत्रांकडून समजते. त्यामुळे सध्या तरी रस्ते दुरुस्ती रखडेल असे चित्र आहे.
महापालिकेने रोखल्या निविदा
शहर भागात साधारणत: पाच टक्के कमी किंवा आठ
टक्के अधिक बोली लावली जाते, तर उपनगरात अंदाजित खर्चापेक्षा कमी बोली लावण्याचा ठेकेदारांचा कल
असतो.
दक्षिण मुंबईतील पदपथ दुरुस्ती, पर्जन्य जलवाहिन्यांची दुरुस्ती आदी कामे या अंतर्गत
होणार आहेत.
देवनार, अणुशक्तीनगर, गोवंडी, मानखुर्द या ठिकाणी रस्ते कामांसाठी मागविलेल्या निविदा अंदाजित खर्चापेक्षा कमी आहेत. मात्र, महापालिकेने या निविदाही रोखल्या आहेत.