दक्षिण मुंबईतील सुवर्णकार महापालिकेच्या रडारवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2018 06:42 AM2018-05-17T06:42:12+5:302018-05-17T06:42:12+5:30
अग्निसुरक्षेचे नियम धाब्यावर बसवून मुंबईकरांच्या जिवाशी खेळणाऱ्या उपाहारगृहांनंतर मुंबई महापालिकेने आता दक्षिण मुंबईतील सुवर्णकारांकडे आपला मोर्चा वळवला आहे.
- शेफाली परब-पंडित
मुंबई : अग्निसुरक्षेचे नियम धाब्यावर बसवून मुंबईकरांच्या जिवाशी खेळणाऱ्या उपाहारगृहांनंतर मुंबई महापालिकेने आता दक्षिण मुंबईतील सुवर्णकारांकडे आपला मोर्चा वळवला आहे. बेकायदा चिमण्या कारवाईनंतरही पुन्हा बसविणे, ज्वलनशील पदार्थांचा वापर, कामगार कायद्याचे उल्लंघन तसेच जागेच्या वापरात बेकायदा बदल अशा अनेक कारणांमुळे सुवर्ण घडवणारे हे कारखाने आता महापालिकेच्या रडारवर आहेत. त्यानुसार या कारखान्यांना आणि जागेच्या मालकांना महापालिकेने नोटीस धाडण्यास सुरुवात केली असून, महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियम (एमआरटीपी) कायद्यांतर्गत लवकरच त्यांच्या मुसक्या आवळण्यात येणार आहेत.
दक्षिण मुंबईतील काळबादेवी, झवेरी बाजार या परिसरात सुवर्ण घडविणारे कारखाने आहेत. या कारखान्यांवरील बेकायदा चिमणीतून बाहेर पडणाºया विषारी वायूंमुळे स्थानिक रहिवाशांचे आरोग्य धोक्यात आहे. त्यामुळे हे कारखाने बंद करण्याची मागणी गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहे. या प्रकरणी काळबादेवीतील स्थानिक रहिवाशांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे धाव घेतली होती. त्यानंतर येथील बेकायदा चिमण्यांवरील कारवाईला वेग आला होता. मात्र चिमणी काढल्यानंतर काही दिवसांनी कारखान्यावर पुन्हा प्लॅस्टिकची नवीन चिमणी उभारण्यात येत असल्याने या कारवाईचे उद्दिष्टच असफल झाले होते. अखेर याबाबत नुकत्याच झालेल्या बैठकीत पालिकेने येथील सुवर्णकारांवर एमआरटीपीअंतर्गत कारवाईचा निर्णय घेतला आहे.
दक्षिण मुंबईत काळबादेवी परिसरात २ हजार २५ सुवर्णकारांचे कारखाने आहेत. यापैकी गेल्या काही दिवसांमध्ये १४६ कारखान्यांवरील चिमण्या काढण्यात आल्या होत्या. मात्र काही दिवसांनी पुन्हा चिमण्या लावण्यात आल्याच्या तक्रारी येऊ लागल्या. तसेच कायद्याचे उल्लंघन करीत हे कारखाने २४ तास सुरू असतात. कामगार येथे रात्रीचेही वास्तव्यास असून, ज्वलनशील पदार्थांच्या वापरामुळे आगीचा धोकाही संभवतो. कमला मिल येथील आगीची पुनरावृत्ती होऊ शकते. त्यामुळे अखेर महापालिकेने कठोर पावले उचलली असल्याचे समजते. दर सहा महिन्यांनी या कारखान्यांच्या परवान्याचे नूतनीकरण असते. मात्र तेही आता बंद करण्यात येणार आहे.
>रहिवाशांना
श्वसनाचा विकार
बेकायदा चिमण्यांमधून विषारी वायू बाहेर पडत असल्याने काळबादेवीतील ५५ टक्के रहिवासी दमा व श्वसनाच्या विकारांनी त्रस्त आहेत, तसेच या कारखान्यांतील अकुशल कामगार अति ज्वलनशील पदार्थ हाताळतात.
बेकायदा सिलिंडर्समुळे या कारखान्यांमध्ये आगीचा
धोका संभवतो.
>कठोर कारवाईचे आश्वासन
काळबादेवी परिसरात या सुवर्ण कारखान्यांमुळे नागरिक गेल्या दोन दशकांहून अधिक काळ हैराण आहेत. तीन महिन्यांपूर्वी मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्यानंतर या कारखान्यांवरील कारवाईला गती मिळाली. महापालिकेनेही नुकत्याच झालेल्या बैठकीत कठोर कारवाईचे आश्वासन दिले आहे. त्यामुळे अनेक वर्षांचा हा लढा फळास येईल, अशी आशा आहे.
- हरकिशन गोराडिया (काळबादेवी रेसिडेंट असोसिएशन)
संबंधितांना पाठविली नोटीस
या सुवर्णकारांवर एमआरटीपी अंतर्गत कारवाई करण्यात येणार आहे. त्यानुसार संबंधितांना नोटीसही पाठविण्यात आली आहे. तसेच हे निवासी क्षेत्र असल्याने आपली जागा सुवर्णकारांना देणाºया जागेच्या मालकांना जागेच्या वापरात बेकायदा बदल केल्याची नोटीस धाडण्यात येणार आहे. नियमांचे उल्लंघन करून २४ तास सुरू राहणाºया या कारखान्यांविरोधात कामगार आयुक्तांकडेही तक्रार दाखल करण्यात येणार आहे. तसेच परवाना खातेही झाडाझडती घेणार आहे.
- विजय बालमवार (पालिका उपायुक्त)