मुंबई : उत्पन्नाच्या ज्ञात स्रोतापेक्षा अधिक संपत्ती गोळा केल्याच्या आरोपाखाली जून महिन्यापासून सक्तवसुली संचालनालयाच्या (ईडी) अटकेत असलेल्या भारतीय महसूल सेवेचा (आयआरएस) अधिकारी सचिन सावंत याच्या प्रकरणात ईडीने दक्षिण भारतातील एका प्रथितयश अभिनेत्रीची चौकशी केली आहे. सावंत व या अभिनेत्रीमध्ये आर्थिक व्यवहार झाल्याची माहिती मिळाल्याने ही चौकशी झाली आहे. उपलब्ध माहितीनुसार, कोट्यवधींची माया गोळा करत मनी लाँड्रिंग केल्याप्रकरणी आयआरएस अधिकारी सचिन सावंत याला ईडीने जूनमध्ये अटक केली आहे. त्याला अटक झाली त्यावेळी तो लखनौ येथे अतिरिक्त आयुक्त पदावर कार्यरत होता. चौकशीदरम्यान त्याने या अभिनेत्रीसोबत आर्थिक व्यवहार केल्याचे तपास अधिकाऱ्यांना समजल्यानंतर तिला चौकशीसाठी बोलावण्यात आले. सावंत याने या व्यवहारांसदर्भात दिलेल्या माहितीची पडताळणी करण्यासाठी तिची चौकशी झाली आहे.
वडिलांच्या नावे एक बेनामी कंपनीसावंत याच्या कुटुंबीयांच्या नावावर १ कोटी २५ लाख रुपये रक्कम रोखीने भरल्याचीही माहिती अधिकाऱ्यांना मिळाली आहे. तसेच, त्याच्या वडिलांच्या नावे एक बेनामी कंपनीदेखील तयार करण्यात आली होती. या कंपनीच्या माध्यमातून सावंत याच्या पत्नीला नियमितपणे पगार मिळत होता. विशेष म्हणजे, ती कुठेही काम करीत नव्हती. केवळ कागदोपत्री नोकरी दाखवून तिला हे पैसे मिळत होते.
बीएमडब्ल्यू गाडी खरेदी?सावंत याने त्याच्या मित्राच्या नावावर एक आलिशान बीएमडब्ल्यू गाडी खरेदी केल्याचाही अधिकाऱ्यांना संशय असून, त्याचीही आता चौकशी होत आहे.