मुंबई : निवडणूक आयोगाने घालून दिलेल्या निकषानुसार आपल्या कार्यक्षेत्रातील पोलीस उपनिरीक्षक व सहाय्यक निरीक्षकांच्या बदल्या सोमवारी (दि.१८) कोणत्याही परिस्थितीत कराव्यात, असे आदेश पोलीस महासंचालक दत्ता पडसलगीकर यांनी दिले आहेत. त्याबाबतचा अहवाल घटकप्रमुख व विशेष महानिरीक्षकांनी सायंकाळपर्यत पोलीस मुख्यालयात सादर करावयाचा आहे.लोकसभा निवडणूकीसाठी आचारसंहिता अवघ्या पंधरवड्यात लागू होण्याची शक्यता आहे. त्यामुळे २८ फेब्रुवारीपर्यंत सर्व अधिकाऱ्यांच्या बदल्याचे काम पूर्ण करावयाचे असल्याने शनिवारी मुख्यालयातून नव्याने परिपत्रक जारी करुन घटक प्रमुख अधीक्षक, आयुक्त व विशेष महानिरीक्षकांना सूचना करण्यात आल्या आहेत.एका जिल्ह्यात गेल्या चार वर्षाच्या कालावधीत तीन वर्षे कार्यरत असलेले किंवा स्वत:च्या जिल्ह्यात कार्यकारी पदावर नेमणूकीला असलेल्या अधिकाऱ्यांच्या बदल्या निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार करावयाच्या आहेत. त्याचबरोबर २०१५ ते २०१७ या कालावधीत लोकसभा व विधानसभेच्या पोटनिवडणूका ज्या मतदारसंघात झालेल्या होत्या, त्याठिकाणी कार्यरत असलेले आणि जिल्ह्याचा कालावधी पूर्ण झालेल्यांना परिक्षेत्रामध्ये अन्यत्र बदल्या केल्या जाणार आहेत. त्यामध्ये सर्वाधिक प्रमाण हे उपनिरीक्षक व सहाय्यक निरीक्षकाचे असल्याने त्यांची तातडीने सोमवारपर्यत बदलीचे आदेश निर्गमित करण्याची सूचना महासंचालकांनी दिल्या आहेत. त्यानंतर दोन,तीन दिवसामध्ये निरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या जाणार आहेत. सहाय्यक आयुक्त/ उपअधीक्षक आणि अधीक्षकांच्या बदल्या तीन दिवसापूर्वी गृह विभागाकडून करण्यात आल्या आहेत. त्याशिवाय या दर्जाच्या अन्य काही अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या जाणार आहेत. निवडणूक आयोगाच्या निकषानुसार घटकातील कार्यकाळ पूर्ण झालेल्या अप्पर आयुक्त, सहआयुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या बदल्याबाबतचा निर्णय अद्याप प्रलंबित आहे. मुख्यमंत्र्यांच्या संमतीनंतर त्याबाबतचे आदेश जारी केले जाणार आहेत.
पीएसआय, एपीआयचे आज निवडणूक गॅझेट; एसपी, आयजींना बदल्यांचे अधिकार
By ऑनलाइन लोकमत | Published: February 17, 2019 8:31 PM