मुंबई : औरंगजेबासंदर्भात केलेल्या वक्तव्याबद्दल समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांचा अटकपूर्व जामीन अर्ज सत्र न्यायालयाने मंजूर केला. आझमी यांनी केलेली टिप्पणी कोणत्याही व्यक्तिमत्त्वाचा अपमान करणारी किंवा धार्मिक भावनांना दुखावणारी नाही, असे निरीक्षण न्यायालयाने अटकपूर्व जामीन अर्ज मंजूर करताना नोंदविले.
अतिरिक्त सत्र न्यायालयाचे न्या. व्ही. जी. रघुवंशी यांनी आझमी यांचा अटकपूर्व जामीन अर्ज मंजूर केला. राज्याच्या विधानसभेतून २६ मार्चपर्यंत निलंबित केलेल्या आमदार अबू आझमी यांनी सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला. 'कोणत्याही व्यक्तिमत्त्वाचा अपमान करण्याचा किंवा कोणत्याही व्यक्तीच्या धार्मिक भावना दुखावण्याचा पूर्वनियोजित हेतू नव्हता. उत्स्फूर्तपणे पत्रकार परिषदेत ही विधाने करण्यात आली,' असे आझमी यांनी जामीन अर्जात म्हटले आहे.
अबू आझमी यांची जामिनावर सुटका करताना न्यायालयाने त्यांना काही अटी घातल्या. तसेच २० हजार रुपयांचा बाँडही भरण्यास सांगितले. न्यायालयाने आझमी यांना १२, १३, १४ मार्च रोजी मरिन ड्राइव्ह पोलिस ठाण्यात हजेरी लावून तपासाला सहकार्य करण्याचे निर्देश दिले.
आझमी यांनी कोणाच्याही धार्मिक भावना दुखावल्या नाहीत किंवा व्यक्तिमत्त्वाचा अपमान केला नाही. पत्रकारांनी प्रश्न विचारल्याने त्यांनी त्यांच्या प्रश्नांना उत्स्फूर्तपणे उत्तर दिले हे सर्व पूर्वनियोजित नव्हते, असा युक्तिवाद आझमी यांचे वकील मुबीन सोलकर यांनी केला.