राणे पिता-पुत्र हाजीर हो...; दिशा सालियन प्रकरणी नारायण राणे, नितेश राणेंना नोटीस
By ऑनलाइन लोकमत | Published: March 2, 2022 10:14 AM2022-03-02T10:14:43+5:302022-03-02T10:15:36+5:30
दिशा सालियन प्रकरणात नारायण राणे आणि नितेश राणेंना मालवणी पोलीस ठाण्याकडून नोटीस पाठवण्यात आली आहे.
अल्पेश करकरे
मुंबई : दिशा सालियन प्रकरणात नारायण राणे आणि नितेश राणेंना मालवणी पोलीस ठाण्याकडून नोटीस पाठवण्यात आली आहे. त्यांना ४ मार्च रोजी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. दिशा सालियनच्या आईच्या तक्रारीवरून राणे पिता पुत्रांच्या अडचणीत वाढ झाली आहे.
नारायण राणे आणि नितेश राणेंमागची साडेसाती काही संपत नाहीये. एकामागोमाग एक राणे कुटुंब कोणत्या ना कोणत्या प्रकरणात अडकतातच आहेत. आता राणे परत फसलेत, तक्रारीनंतर थेट नारायण राणे, नितेश राणे दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. त्यात आता राणेंची चौकशीही होणार आहे.
पितापुत्र नेमके फसले कुठे ?
तर दिशा सालियन प्रकरणावरुन आरोप करणं राणेंच्या अंगाशी आलंय. दिशा सालियनची बदनामी केल्याप्रकरणी राणेंवर मालवणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. दिशावर बलात्कार झाला, तिनं आत्महत्या केली नाही तर तिचा खून करण्यात आला असे आरोप राणे पिता-पुत्रांनी केले होते. राज्य सरकारमधला एक मंत्री दिशा प्रकरणामागे आहे असंही राणे म्हणाले होते.
राणे यांच्या आरोपांनर काय घडलं ?
राणेंच्या आरोपानंतर मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिशा सालियनच्या आईवडिलांची भेट घेतली होती. दिशाच्या आईवडिलांनी राणे कुटुंबाचे आरोप फेटाळून लावले होते. व्यवसायातील तणावामुळे दिशानं आत्महत्या केली असं आईवडिलांनी पत्रकार परिषद घेऊन सांगितलं होतं. तरीही नितेश राणे आणि नारायण राणेंनी दिशा प्रकरणावरुन आरोप सुरुच ठेवले. त्यामुळे तिच्या आईवडिलांनी राज्य महिला आयोगाकडे तक्रार केली. या तक्रारीनुसार महिला आयोगाने चौकशीचे आदेश दिले. पोलिसांनी महिला आयोगाला चौकशी करुन अहवाल दिला. या अहवालात दिशा सालियनचा पोस्ट मार्टम रिपोर्टही जोडण्यात आलाय. पोस्ट मॉर्टम रिपोर्टनुसार दिशावर लैंगिक अत्याचार झाला नसल्याचं स्पष्ट झालंय, तसंच ती गरोदर नव्हती असंही स्पष्ट करण्यात आलंय. त्यानंतर दिशा सालियनची बदनामी केल्याप्रकरणी नारायण राणेंवर गुन्हा दाखल करण्यात आलाय.
विशेष म्हणजे मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकरांनी राणेंविरोधात कारवाईची मागणी केली होती. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकरांना पत्र लिहित गुन्हा दाखल करायची मागणी केली होती. त्यानुसार राज्य महिला आयोगानं राणेंविरोधात मालवणी पोलीस स्टेशनला अहवाल सादर केला आणि त्यानुसार राणेंविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. दिशा सालियनची बदनामी केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आलाय.
नारायण राणे दिशा सालियनबद्दल काय बोलले होते ?
बलात्कार करुन दिशाची हत्या झाली आणि जगाला सांगितले आत्महत्या केली. का करेल ती आत्महत्या? एक तर ती पार्टीला जात नव्हती. त्यानंतर तिला थांबायला सांगितले, पण ती थांबली नाही. घरी निघाली. त्यानंतर तिथे कोण कोण होते. पोलीस संरक्षण कोणाला होते. तिच्यावर बलात्कार होत असताना बाहेर पोलीस कोणाचं संरक्षण करत होते? दिशा सालियनचा पोस्ट मार्टम रिपोर्ट अद्याप का आला नाही? ती ज्या इमारतीत राहायची त्या दिवशी ८ जूनचे रजिस्टर कोणी फाडले? दिशाच्या इमारतीमधील सीसीटीव्ही फुटेज गायब कसे झाले ? असे नारायण राणे म्हणाले होते.
राणे टप्प्यात आले की शिवसेना कार्यक्रम करतेय ?
यापूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंविरोधात वादग्रस्त विधान केल्यामुळे राणेंवर गुन्हा दाखल झाला होता, राणेंना अटक झाली होती, भर जेवणाच्या ताटावरुन उठवून अटक झाली होती. त्यानंतर शिवसैनिक संतोष परब हल्लाप्रकरणात नितेश राणेंवर गुन्हा दाखल झाला होता. मग शिवसेना आमदार वैभव नाईक यांच्या तक्रारीनंतर निलेश राणेंवर गुन्हा दाखल झाला. कोर्टाबाहेर पोलिसांशी बाचाबाची केली म्हणून हा गुन्हा दाखल करण्यात आला. आता नारायण राणे आणि नितेश राणे दोघांवर परत गुन्हा दाखल झालाय आणि तोही शिवसेनेच्या पाठपुराव्यामुळेच. त्यामुळे राणे टप्प्यात आले की शिवसेना त्यांचा करेक्ट कार्यक्रम करतेच करते याची उघडपणे चर्चा सुरु झालीय. आता सालियन प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर पुन्हा एकदा राणे पिता-पुत्रांना अटक होण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्यांना कसं यात शिक्षा करता येईल याविषयी देखील प्रयत्न सुरू आहेत असे म्हटले जात आहे.