Join us

कुर्ल्यातील ‘स्पार्क’ गँगचे बिंग फुटले

By admin | Published: April 30, 2017 3:21 AM

वाहनाच्या इंजिनातून धूर येतोय असे सांगून वाहन थांबवून वाहन दुरुस्तीच्या नावाखाली फसवणूक करणारी गँग मुंबईत सक्रिय झाली आहे. ही गँग स्पार्क या नावाने

मुंबई : वाहनाच्या इंजिनातून धूर येतोय असे सांगून वाहन थांबवून वाहन दुरुस्तीच्या नावाखाली फसवणूक करणारी गँग मुंबईत सक्रिय झाली आहे. ही गँग स्पार्क या नावाने ओळखली जाते. कुर्ला पोलिसांनी या गँगमधील तिघांना अटक केली आहे. अब्दुल लतीफ गौस मोईद्दीन सय्यद (४३), मोहम्मद जाहिद उर्फ जुईब नूर मोहम्मद शेख (२६) आणि रेहमान अजमतली शेख (३५) अशी अटक आरोपींची नावे आहेत. शुक्रवारी कुर्ला परिसरात एका चालकाला त्याच्या वाहनातून धूर येत असल्याचे सांगून त्रिकूटाने थांबविले. मेकॅनिक असल्याचे सांगून गाडी दुरुस्त करून देतो असे त्यांनी सांगितले. चालकालाही लांबचा पल्ला गाठायचा असल्याने त्याने दुरुस्तीसाठी होकार दिला. दुरुस्ती झाल्यानंतर या त्रिकूटाने त्यांना १२ हजारांचा खर्च सांगितला. हे ऐकून चालकाला संशय आला. त्याने पैसे देण्यास नकार देताच तिघेही दमदाटी करू लागले. त्यानंतर पैशांची जमवाजमव करतो, असे सांगत या त्रिकूटाला काहीही कळू न देता त्याने पोलिसांना माहिती दिली. कुर्ला पोलिसांनीही तातडीने घटनास्थळी धाव घेत त्रिकूटाला अटक केली. पोलिसी खाक्या दाखवताच त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. त्यांनी अनेकांची फसवणूक केल्याचे चौकशीत समोर आले आहे. तिघेही रफिक नगर झोपडपट्टीतील रहिवासी आहेत. देवनार, एमआयडीसी, डोंगरी पोलीस ठाण्यात त्यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल आहेत. त्यांच्या टोळीत अन्य साथीदार आहेत का, याचा पोलीस शोध घेत आहेत. (प्रतिनिधी)