चिमण्यांचा दिवस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2021 04:06 AM2021-03-15T04:06:12+5:302021-03-15T04:06:12+5:30
इवलूशा चिमण्यांची आठवण झाली की शंकर रमणी यांच्या खालील गीताची हमखास धून कानात गुंजते. माझिया दारात चिमण्या आल्या अबोल ...
इवलूशा चिमण्यांची आठवण झाली की शंकर रमणी यांच्या खालील गीताची हमखास धून कानात गुंजते.
माझिया दारात चिमण्या आल्या
अबोल काहीसे बोलून गेल्या।
कळले सारे नि कळले नाही
अबोल मनाची हासली जुई।
दाटून दिशांत उठला गंध
झडली जाणीव गळले बंध।
प्राणांस फुटले अद्भुत पंख
तंद्रीत भिनला आकाश डंख।
माझिया दारात चिमण्या आल्या
आगळे वेगळे सांगून गेल्या।
जागतिक पातळीवर ‘चिमण्याचा दिवस’ साजरा होत असलेल्याला एक तप लोटले. इवलूशी चिऊताई, पण आपल्या प्रचंड परिसंस्थेत तिचे किती महत्त्वाचे स्थान आहे. ‘एक घास काऊचा, एक घास चिऊचा’ म्हणत जेऊ घालणारी आई व मोठे होत जाणारे आपण त्या स्मृतिलुब्ध आठवणी सोबत घेऊन जगत असतो. जुन्या घरात माळ्यावर, ओटीवर टांगलेल्या फ्रेमच्या मागे, लाकडी खांबाच्या आडोशाला चिव ssचिव sss चिमणी खोपा बांधायची. त्यात तंतू, पिसे गोळा करून मऊमऊ बिछाना तयार करायची. आपण ते सारे कुतूहलाने न्याहाळायचो. अंड्यापासून पिल्ले तयार होईपर्यंत चिमणा-चिमणीची काय ती लगबग चालायची! पण गावातील जुनी घरे नामशेष झाली. नागरी वस्ती वाढल्या. इमारत आल्या. चिमण्या भुर्र उडून गेल्या. त्यातच मोबाइल टॉवरच्या लहरी आणि सणासुदीला फुटणारे कर्कश आवाजाचे फटाके यामुळे उरल्यासुरल्या चिमण्या सैरभैर झाल्या. दाण्यापाण्याला मोताद झाल्या.
गेल्या होलिकोत्सवात कवी अरुण म्हात्रे म्हणाले होते:
आज जरा कन्फुज आहे हो, रंग कसं उधळू मी?
आज दिवस चिमण्यांचा आहे, रंग कुठे उडवू मी?
मान्य मला ही होली आहे, मनात ह्या पिचकाऱ्या...
चिमण्यांच्या चोचीतले पाणी असे कसे संपवू मी?
डहाळीवर एकाकी बसलेला चिमणा आश्वस्त होता, तसाच अस्वस्थ देखील होता. तिच्या वाटेत डोळे घालून बसला होता. त्याची नजरच जणू, वाट बनून गेली होती. तोच, त्याला ती लांबून येताना दिसली. तो फांदीवर सरकला. ती चिवचिवत आली आणि त्याच्याशी लगट करू लागली. त्याच्या नजरेतील ओढ तिला जाणवली आणि तिची भेटीची आतुरता त्याला भावली.
‘खूप उशीर केलास, यायला !’ चिमण्याने चिमणीला काकुळतीने विचारले.
‘हो, रे ! काय करणार? सगळं संसार निस्तरून यावे लागले,बघ.’
‘मग, आता?’
‘पिल्ले मोठी झाली व त्यांनी आकाशात भरारी घेतली. जोडीदार कुठल्याशा परदेशी निघून गेला. तुझी सय आली तशी इथे निघून आली.’
‘मी तुझी वाट पाहत होतो. ते बघ, वर !’
तिने मान वर करून बघितले. ‘अय्या ! किती छान !’ ती चिव चिवचिवली. त्याने बांधून तयार ठेवलेले घरटे तिला जाम आवडले. हलकेच झेपावत, ती त्या घरट्यात घुसली. आत मऊ मऊ पिसे अंथरलेली होती.
‘तू वेडा की काय, एकट्याने एवढा त्रास घेतलास !’
‘तू येशील ही खात्री होती, ना !’
तिने कृत्यकोपाने त्याला नजर भिडवली नि त्याच्या नजीक सरकली.
चिमण्यांचं असे हे स्वप्नवत जग आता शहरीकरणामुळे पार उद्ध्वस्त झाले आहे. जगातल्या खूपशा शहरात २० मार्च रोजी ‘चिमण्यांचा दिवस’ साजरा होतो. ‘मला चिमण्या आवडतात’, या घोषणेद्वारा २०१० पासून हे साजरीकरण होत असते. जगात चिमण्यांच्या २६ जाती आहेत व त्यातील ५ जातीच्या चिमण्या आपल्या देशात आढळतात. २०१५ सालच्या मोजणीनुसार, लखनौमध्ये ५६९२, तर पंजाबच्या काही भागात केवळ ७७५ चिमण्या आढळल्या होत्या. घरगुती चिमण्या या मानवी जीवनाशी खूपच निगडित असत, परंतु गेल्या काही वर्षात त्यांची संख्या खालावली. पर्यावरणाचा ऱ्हास हे त्याचे मुख्य कारण होय. वाढते प्रदूषण आणि पक्ष्यांबध्दलचा निष्काळजीपणा यामुळे एकूण जैवविविधता धोक्यात आल्याचे हे ठळक लक्षण आहे.
तेव्हा डॉ. अब्दुल कलाम यांनी सांगितलेली गोष्ट आठवते, ’मी एकदा चिमणी पाळली, पण काही दिवसांनी ती उडून गेली. नंतर, मी एक खारुताई पाळली, पण तीदेखील काही दिवसांनी पळून गेली. मग, मी एक झाड लावले, दोघेही परत आले.’
ही वस्तुस्थिती आपण समजून घेणार आहोत का? केवळ कृत्रिम घरटी योजून त्यांना वसाहतीस उत्तेजन देण्यात येते, ते पुरेसे नाही. अर्थात, नागपूर, भंडारा येथे स्थित असलेले शास्त्रज्ञ डॉ. बहार बावीस्कर यांचे गोदिया जिल्ह्यातले चिमणी संवर्धनाचे कार्य उल्लेखनीय आहे, हे आवर्जून सांगावेसे वाटते.
- जोसेफ तुस्कानो