पहिले दाम बोला, मग काम बोला

By admin | Published: February 15, 2017 05:08 AM2017-02-15T05:08:27+5:302017-02-15T05:08:27+5:30

कुर्ला मे तो साडेसात सो मिल रहा है, अपना भाव क्या चल रहा है...’, ‘बिर्यानी मिल रही है क्या... चांदिवली मे तो कम दाम है’, ‘बोलो किधर जाने का?

Speak the first price, then work | पहिले दाम बोला, मग काम बोला

पहिले दाम बोला, मग काम बोला

Next

मुंबई : ‘कुर्ला मे तो साडेसात सो मिल रहा है, अपना भाव क्या चल रहा है...’, ‘बिर्यानी मिल रही है क्या... चांदिवली मे तो कम दाम है’, ‘बोलो किधर जाने का? उधर वेस्टर्न मे देखो यार हजार का भाव चल रहा है’, ‘तुम भी क्या लोग है यार अपना आदमी समझ के लो ना.. बाद मे झिगझिग बिल्कुल नही चाहिये’, ‘देख भाय, अपने पास जितना बोले गा उतना आदमी मिलेगा पर पैसा टाइम पे मिलना चाहिये,’ असे संवाद सध्या परवलीचे झाले आहेत. अशी भाषा तुम्हाला कोड लँग्वेजमध्ये ऐकण्यास मिळाल्यास भुवया उंचावतील. पण हा संवाद निवडणुकीतील ‘भाडोत्री कार्यकर्त्यां’चा आहे.
मुंबई महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीने वेग पकडला असतानाच राजकीय पक्षांच्या प्रचारार्थ निघणाऱ्या रॅलीसाठी कार्यकर्ते मिळेनासे झाले आहेत. परिणामी, प्रचार रॅलीत गर्दी वाढावी म्हणून ‘भाडोत्री’ कार्यकर्त्यांवर जोर दिला जात आहे. एका ‘भाडोत्री’ कार्यकर्त्यासाठी राजकीय पक्षाच्या उमेदवाराला दिवसाला किमान ३०० तर कमाल ७५० रुपये मोजावे लागत आहेत. परिणामी, महापालिका निवडणुकीच्या प्रचाराची स्थिती ‘दाम बोला, काम बोला’ अशी झाली आहे. ‘भाडोत्री’ कार्यकर्त्यांची मात्र चंगळ सुरू आहे. (प्रतिनिधी)
अखेरच्या प्रचारात कार्यकर्त्यांचा भाव दुप्पट
च्निवडणुकीतील प्रचाराच्या अखेरच्या टप्प्यात उमेदवाराच्या मागे फिरणाऱ्या कार्यकर्त्यांचा भाव दुप्पट करण्यात आला आहे. अवघ्या ३०० रुपयांमध्ये मिळणाऱ्या कार्यकर्त्यांना अखेरच्या पाच दिवसांत दुप्पट पैसे देण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
च्त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. निवडणूक प्रचाराच्या सुरुवातीच्या दिवसांत जेथे ३०० रुपयांचा भाव मिळत होतो तेथे अखेरच्या पाच दिवसांत ५०० ते ६०० रुपये इतका भाव
करण्यात आला आहे. त्यामुळे अनेक जण कुटुंबासह प्रचारात उतरत आहेत.
मुंबई शहर, पूर्व उपनगर आणि पश्चिम उपनगरानुसार प्रत्येक वॉर्डातील प्रत्येक प्रभागागणिक ‘भाडोत्री’ कार्यकर्त्यांचे दर आहेत. विविध ठिकाणांवरील विविध राजकीय पक्षांच्या वरिष्ठ कार्यकर्त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवसेना वगळता उर्वरित सर्वच राजकीय पक्षांच्या प्रचार रॅलीमध्ये ‘भाडोत्री’ कार्यकर्ते निदर्शनास येत आहेत.
च्मुंबई शहराचा विचार करता भायखळा, वरळी आणि लोअर परळ येथील राजकीय पक्षांच्या प्रचार रॅलीतील ‘भाडोत्री’ कार्यकर्त्याला किमान ३०० ते कमाल ७५० रुपये दिले जात आहेत.
पश्चिम उपनगरातील मालाड, बोरीवली आणि कांदिवली येथील प्रभागांमध्ये राजकीय पक्षांच्या प्रचार रॅलीत सहभागी कार्यकर्त्याला कमाल-किमान म्हणून पाचशे रुपये अदा केले जात आहेत. तर काही ठिकाणी हा दर साडेसातशे रुपये आहे. जिथे हा दर तीनशे आणि पाचशे आहे; तेथील जेवणात बिर्याणीचा समावेश आहे.
पूर्व उपनगरात कलिना विधानसभा क्षेत्रातील प्रभागांत राजकीय पक्षांच्या प्रचार रॅलीत सहभागी होत असलेल्या ‘भाडोत्री’ कार्यकर्त्यासाठी ५०० रुपयांचा भाव सध्या सुरू आहे. यात एकावेळच्या जेवणाचा समावेश आहे.
चांदिवली विधानसभा क्षेत्राचा विचार करता येथेही पाचशे रुपये हा दर आहे. यात एकावेळच्या जेवणाचा समावेश आहे.
एखाद्या प्रभागात निघणाऱ्या प्रचार रॅलीत भलत्याच प्रभागातील कार्यकर्ते दिसून येत असल्याने मुंबईत ‘भाडोत्री’ कार्यकर्त्यांच्या चर्चेला सध्या चांगलेच उधाण आले आहे. या कार्यकर्त्यांमध्ये गृहिणी महिलांनादेखील स्थान दिले जात आहे. यात चाळीत अथवा झोपडपट्टी परिसरात वास्तव्य करणाऱ्या महिलांचा मोठ्या प्रमाणावर समावेश आहे.
साहेब, रात्रीची ‘सोय’ करा...-
राजकीय पक्षांचा प्रचार आणि प्रसार म्हटले की दारू आलीच. पण आपण आपल्या कार्यकर्त्यांची ‘रात्रीची सोय करत आहोत...’ याची कुणकुण मात्र कोणत्याच उमेदवाराला कोणालाच लागू द्यायची नसल्याचे चित्र आहे. ही वस्तुस्थिती कोणीही कितीही नाकारत असले तरी ‘तळीरामां’कडून साहेबांना रात्रीची सोय करण्याची विनवणी केली जात आहे.
अगदी गत आठवड्यातील सोमवारपासून आजपर्यंतचा विचार केला तरी पूर्व उपनगरातील एका प्रभागात एका दिवसासाठी दाखल झालेल्या कार्यकर्त्याच्या सोयीसाठी सगळीच यथेच्छ सोय ठेवली जात आहे. ही तर केवळ सुरुवात असली तरी येत्या आठवड्यात ‘चिअर्स’ म्हणत आणखी पार्ट्या रंगणार असल्याचेच चित्र आता निर्माण झालेले आहे.

Web Title: Speak the first price, then work

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.