मुंबई : कोरोना विषाणुच्या संकटामुळे सर्वात जास्त अडचणीत सापडलेल्या गरीब, कामगार, स्थलांतरीत मजूर, सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांच्या मदतीसाठी काँग्रेसने पक्षाने देशव्यापी चालवलेल्या आॅनलाईन मोहीम ‘स्पीक अप इंडिया’ला महाराष्ट्रातही उदंड प्रतिसाद मिळाला आहे. झोपेचे सोंग घेतलेल्या केंद्र सरकारने आतातरी जागे व्हावे आणि या घटकांना मदत करावी, अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष तथा महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केली आहे.
गुरुवारी सकाळी ११ ते दुपारी २ या वेळेत चालवलेल्या या आॅनलाईन मोहिमेत राज्यातील काँग्रेसचे मंत्री, ज्येष्ठ नेते, आमदार, खासदार, पक्ष पदाधिकारी, जिल्हा, तालुका पातळीवरील पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी हजारोंच्या संख्येने सोशल मीडियाच्या माध्यमातून सहभागी झाले होते. गरिबांच्या खात्यात १० हजार रुपये जमा करावेत व पुढील सहा महिने प्रतिमहा ७५०० रुपये द्यावेत, स्थलांतरीत मजुरांना सुखरुप घरी पोहचवण्याची व्यवस्था केंद्र सरकारने करावी. सुक्ष्म, लघु व मध्यम उद्योजकांना आर्थिक मदत द्यावी तसेच मनरेगातर्फे २०० दिवसांचा रोजगार द्यावा या मागण्या या स्पीक अप इंडिया कॅम्पेनच्या माध्यमातून केल्या आहेत.
देश सध्या अभूतपूर्व संकटाचा सामना करत असून लॉकडाऊनमुळे कामगार, गरिब, हातावर पोट असलेले, शेतकरी, लघु उद्योजक यांना मोठ्या कठिण परिस्थितीचा सामना करावा लागतो आहे. या राष्ट्रीय संकटात केंद्र सरकारने सढळ हस्ते मदत करुन पीडित घटकांना आधार देण्याची गरज असताना त्याकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप थोरात यांनी केला.