शेलारांच्या सांगण्यावरून गडकरींनी बदलली 'भाषा'
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 7, 2018 05:53 PM2018-04-07T17:53:20+5:302018-04-07T17:53:20+5:30
राज यांच्या या वक्तव्यानंतर प्रेक्षकांनीही 'फूSSफूSSफू', असा आवाज काढून गडकरींची खिल्ली उडविली होती.
मुंबई: भाजपाच्या 38 व्या स्थापनादिनानिमित्त मुंबईत झालेल्या महामेळाव्यात पक्षाच्या प्रमुख नेत्यांनी भाषणे केली. यापैकी केंद्रीय भुपृष्ठ व वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या भाषणातील एक क्लिप सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
नितीन गडकरी यांनी कालच्या भाषणात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिले. शिवाजी पार्कवर या, आम्ही किती काम केलं ते तुम्हाला दाखवतो, असे त्यांनी म्हटले. यानंतर गडकरी यांनी आपल्या विभागाकडून महाराष्ट्रातील विकासकामांसाठी देण्यात आलेल्या निधीचे आकडे सांगायला सुरूवात केली. परंतु, ही सर्व माहिती ते हिंदीत सांगत होते. त्यावेळी व्यासपीठावर उपस्थित असणारे मुंबई भाजपाचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी जवळ जाऊन गडकरींना निधीचे आकडे 'मराठीत सांगा', असे सांगितले. विशेष म्हणजे गडकरी यांनी पुढच्याच शब्दाला मराठीतून बोलायला सुरूवात केली. नितीन गडकरींनी हे सगळे इतक्या सफाईदारपणे आणि कौशल्याने केले की समोर असलेल्या अनेकांना ही गोष्ट लक्षात आलीच नाही. मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे त्यावेळचे सूचक हास्य बरेच काही सांगून गेले.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढीपाडवा मेळाव्यात नितीन गडकरी यांच्यावर सडकून टीका केली होती. गडकरी जाहीर कार्यक्रमांमध्ये वाट्टेल ती आश्वासने देत फिरतात. ते एखाद्या लहान मुलाप्रमाणे साबणाचा फेस आणि नळीच घेऊन फिरत असतात. कुठेही गेले एक लाख कोटी, दोन लाख कोटींचे फुगे उडवतात. मात्र, हे सर्व प्रकल्प हाती घ्यायला सरकारकडे तेवढा निधी आहेच कुठे?, असा सवाल राज यांनी विचारला. राज यांच्या या वक्तव्यानंतर प्रेक्षकांनीही 'फूSSफूSSफू', असा आवाज काढून गडकरींची खिल्ली उडविली होती.