'कायद्याच्या चौकटीत राहून भाषण करावं'; दसरा मेळाव्यापूर्वी देवेंद्र फडणवीसांचा इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: October 4, 2022 03:56 PM2022-10-04T15:56:26+5:302022-10-04T15:58:45+5:30
दोन्ही मेळावे हे शांततेत पार पाडले जातील यासाठी बंदोबस्त ठेवण्यात येईल, अशी माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
मुंबई- यंदाचा दसरा मेळावा शिंदे गट आणि ठाकरे गट यांच्यासाठी महत्त्वाचा आहे. त्यामुळे दोन्ही गटाकडून राज्यातून कार्यकर्त्यांना मुंबईत येण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. उच्च न्यायालयात ठाकरे गटाला शिवाजी पार्कवर दसरा मेळावा करण्याची परवानगी मिळाल्यानंतर आता ठाकरे गटाकडून मेळाव्यासाठी जोरदार तयारी करण्यात येत आहे तर दुसरीकडे शिंदे देखील बीकेसी येथील मैदानावर मेळावा घेण्यासाठी जोरदार तयारी करत आहे.
दसरा मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर कायदा आणि सुव्यवस्था नीट राखली जाईल. दोन्ही मेळावे हे शांततेत पार पाडले जातील यासाठी बंदोबस्त ठेवण्यात येईल, अशी माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. कायद्याच्या पलीकडं जाणून कोणी बोललं तर कायदा आपलं काम करेन. राजकारणात एकमेकांवर टीका टिपण्णी होत असते. पण हे कायद्याच्या चौकटीत राहून करावं, असा इशारा देखील देवेंद्र फडणवीस यांनी दिला.
शिंदे गटाच्या मेळाव्यात जेवणाची सोय, शिवसैनिकांना फूड पॅकेट्स देणार
कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस प्रशासन सज्ज आहे. हायकोर्टानं दिलेल्या निर्देशाचं पालन होईल यासाठी पोलीस तत्पर असतील. अडीच ते ३ लाखापेक्षा जास्त लोक बीकेसीत दसरा मेळाव्याला येतील. खऱ्या अर्थाने हिंदुत्वाचा, बाळासाहेबांचा जो विचार होतो त्याचं संबोधन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे करतील. असंख्य नागरिक एकनाथ शिंदे यांचे स्वागत करण्यासाठी जमतील असा विश्वास मंत्री दीपक केसरकर यांनी व्यक्त केला.
दरम्यान, शिवतीर्थावर होणाऱ्या दसरा मेळाव्यासाठी दीड लाखांपर्यंत शिवसैनिकांची गर्दी जमण्याची योजना आखण्यात आली आहे. विविध जिल्ह्यांमधून शिवसैनिक शिवतीर्थावर पोहोचवण्याची जबाबदारी जिल्हाप्रमुखांवर सोपवण्यात आली आहे. तर शिवसैनिकांच्या स्वागताची जबाबदारी मुंबईतील शिवसेनेच्या शाखाप्रमुखांना देण्यात आली आहे. न भूतो न भविष्यति असा दसरा मेळावा भरवा, असा आदेश माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना दिले आहेत.
दसरा मेळाव्याला बीकेसीत ३ लाख गर्दी जमेल; मंत्री दीपक केसरकरांचा विश्वास
कडवट शिवसैनिकाचे मनोगत ऐकण्यासाठी या- एकनाथ शिंदे
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बीकेसी मैदान येथे होणाऱ्या शिवसेनेच्या भव्य दसरा मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर तयारीचा आढावा घेतला. राज्याच्या कानाकोपऱ्यातून लाखो शिवसैनिक मेळाव्यासाठी येणार असून त्यांची कोणतीही गैरसोय होऊ नये यासाठी व्यक्तीशः कामाचा आढावा घेतल्याचं एकनाथ शिंदे यांनी सांगितलं. तसेच आम्ही सारे विचारांचे वारसदार असून एका सच्चा हिंदुत्ववादी कडवट शिवसैनिकाचे मनोगत ऐकण्यासाठी बीकेसी मैदानावर आवर्जून या असे आवाहन देखील एकनाथ शिंदे यांनी माध्यमांशी बोलताना केलं.
शिंदे गटाला ठाकरेंचंही टीझरनेच उत्तर-
निष्ठेचा सागर उसळणार, भगवा अटकेपार फडकणार, महाराष्ट्राची ताकद दिसणार या टॅगलाईनसह शिवसेनेने हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओत बाळासाहेबांच्या दसरा मेळाव्यातील सभेचे जुने फोटो दिसून येतात. त्यामध्ये, बाळासाहेब शिवसैनिकांना संबोधित करतानाचे छायाचित्र आहे. तसेच, जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो या आवाजातील उद्धव ठाकरेंचा संवाद, त्यांच्या सभांचे व्हिडिओ आणि डौलात फडकणारा भगवा ध्वज दिसून येत आहे. एकीकडे शिंदे गटाने टिझर लाँच केल्यानंतर आता ठाकरे गटानेही टिझर लाँच करत निष्ठेचा सागर उसळणार असल्याचे म्हटले आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"