मुंबई : 'महाराष्ट्र विकास आघाडी'च्या प्रमुख नेत्यांची यशवंत चव्हाण सेंटरमध्ये बैठक पार पडली. या बैठकीत विधानसभा अध्यक्षपद काँग्रेसकडे आणि आणि विधानसभा उपाध्यक्ष राष्ट्रवादीकडे असणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी सांगितले.
'महाराष्ट्र विकास आघाडी'ची यशवंत चव्हाण सेंटरमध्ये सुरु असलेली बैठक तब्बल 4 तासानंतर संपली. या बैठकीत खातेवाटप आणि मंत्रिपदाबाबत चर्चा झाली. यावेळी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, काँग्रेसचे अहमद पटेल, जयंत पाटील, पृथ्वीराज चव्हाण, एकनाथ शिंदे, सुनील तटकरे यांच्यासह अजित पवार आणि काही महत्त्वाचे नेते उपस्थित होते.
या बैठकीनंतर बाहेर आलेल्या काँग्रेस नेत्यांनी प्रसार माध्यमांना काहीच प्रतिक्रिया दिली नाही. त्यानंतर बैठकीतून बाहेर आलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी सांगितले की, राज्य मंत्रिमंडळ शपथविधीची पूर्वतयारी व इतर विषयांवर आज 'महाराष्ट्र विकास आघाडी'ची बैठक झाली.
यावेळी विधानसभा अध्यक्षपद काँग्रेसकडे तर उपाध्यक्षपद राष्ट्रवादीकडे असणार असल्याचे सांगितले. तर उपमुख्यमंत्रिपद राष्ट्रवादी काँग्रेसकडे असणार असून राज्य मंत्रिमंडळात शपथ घेणाऱ्या सदस्यांची नावे रात्री उशिरापर्यंत जाहीर होतील. याशिवाय, मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे शपथ घेतील, त्यांच्यासमवेत प्रत्येक पक्षाचे 1 किंवा 2 मंत्री शपथ घेतील. राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार 3 डिसेंबरनंतर होणार असल्याचीही माहिती प्रफुल्ल पटेल यांनी दिली आहे.