Join us

स्पष्टवक्ते अशोक मुळ्ये यांचीच होणार ‘बोलती बंद’...?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2020 1:02 AM

स्वत:चा स्वाभिमान रोखठोक राखत आणि इतरांनाही अभिमान वाटेल अशा पद्धतीचा ‘माझा पुरस्कार’, नाट्यसृष्टीतील मंडळींना गेली अनेक वर्षे ते देत आले आहेत.

- राज चिंचणकर मुंबई : मराठी नाट्यसृष्टीत बिनधास्तपणे वावरणारा अवलिया म्हणून ज्येष्ठ नाट्य व्यवस्थापक अशोक मुळ्ये हे परिचित आहेत. स्वत:चा स्वाभिमान रोखठोक राखत आणि इतरांनाही अभिमान वाटेल अशा पद्धतीचा ‘माझा पुरस्कार’, नाट्यसृष्टीतील मंडळींना गेली अनेक वर्षे ते देत आले आहेत. यंदाही त्यांनी या पुरस्काराचा घाट घातला आहे; पण या पुरस्कार सोहळ्यात स्पष्टवक्ते म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अशोक मुळ्ये यांचीच बोलती बंद होणार का, अशी चर्चा नाट्यसृष्टीत रंगू लागली आहे.२६ फेब्रुवारी रोजी शिवाजी मंदिरात त्यांनी ‘माझा पुरस्कार’ सोहळा नेहमीप्रमाणेच आयोजित केला आहे; मात्र या सोहळ्यात निवडलेल्या एका विषयावरून नाट्यसृष्टीतील या ‘बोलक्या’ व्यक्तिमत्त्वाची बोलती बंद होणार का, हा विषय सध्या महत्त्वाचा ठरला आहे.सडाफटिंग, स्पष्टवक्ते आणि कायम पांढºया कपड्यात वावरणारे म्हणून नाट्यगृहांवर उठून दिसणारे व्यक्तिमत्त्व म्हणून अशोक मुळ्ये यांची ख्याती आहे. त्यांच्या स्वभावधर्मानुसार विविध उपक्रम ते हाती घेतात आणि कसलीही भीती न बाळगता ते तडीसही नेतात. अशोक मुळ्ये यांच्या स्पष्टवक्तेपणावर कुणी आक्षेप घेतलाच, तर त्याची ‘योग्य शब्दांत’ समजूत घालण्यासाठीसुद्धा ते तत्पर असतात.‘मुळ्येकाका, आम्हीही स्पष्ट बोलू शकतो’ असा आगळावेगळा उपक्रम या सोहळ्यात रंगणार आहे. अर्थात, हे सर्व मुळ्येकाकांच्याच संकल्पनेतून आले असणार, याबद्दल कुणाचे दुमत नसले तरी या कार्यक्रमात नाट्यसृष्टीतील मंडळी त्यांच्या ‘लाडक्या’ मुळ्येकाकांना नक्की काय ‘सुनावणार’, याची उत्सुकता वाढली आहे. पुढे काही घडले किंवा बिघडले तरी ते हाताळण्यासाठी अशोक मुळ्ये समर्थ आहेतच.