मुंबई - दिवाळीनिमित्त ऑफर सिझन सुरु असल्याने गर्दीत न जाता घर बसल्या लोकांची ऑनलाईन शॉपिंग दणक्यात सुरु आहे. मात्र, या ऑनलाईन शॉपिंगमुळे एका महिलेची फसगत झाली आहे. या महिलेने ट्विटरवरून याबाबत माहिती वायरल केली आहे. या महिलेने ७ हजार रुपये किंमतीचे जेबीएलचे स्पीकर्सच्या ऑनलाईन मागविले होते. मात्र त्याऐवजी तिला पार्सलमध्ये पणत्या आणि लाडू मिळाले आहेत. हे पार्सल पाहून मी गोंधळले आहे. मला समजत नाही की मी आधी लाडू खाऊ की आधी दिवे लावू, अशा शब्दांत तिने अॅमेझॉनकडे याची ट्विटरवरून तक्रार केली आहे. अॅमेझॉननेही तिच्या तक्रारीची दखल घेत तिला यात योग्य चौकशी करण्याचं आश्वासन दिलं आहे.
अॅमेझॉन या प्रसिद्ध ऑनलाईन शॉपिंग वेबसाईटवरून महिलेने जेबीएल कंपनीचे स्पीकर्स ऑर्डर केले होते. यासाठी तिने ७ हजार रुपयेही भरले होते. मात्र, जेव्हा घरी आलेलं स्पीकरचं पार्सल तिने उघडून पाहिलं आणि तिला धक्काच बसला. त्यात स्पीकरऐवजी दोन पणत्या आणि लाडू होते. ते पाहून त्या महिलेने ट्वीट करून अॅमेझॉनला तक्रार केली.