Lokmat Maharashtrian of the Year Awards 2024 । मुंबई: विविध क्षेत्रातील दिग्गजांच्या उपस्थितीत आज मुंबईतील गेट वे ऑफ इंडिया येथे सर्वात मोठा अन् मानाचा 'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' अवॉर्ड्स सोहळा पार पडला. या सोहळ्यात राज्याचे उपमुख्यमंत्री आणि भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांची 'महामुलाखत' लोकमत समूहाच्या एडिटोरियल बोर्डाचे चेअरमन विजय दर्डा आणि संपादक अतुल कुलकर्णी यांनी घेतली. यावेळी बोलताना फडणवीसांनी विविध राजकीय मुद्द्यांवर भाष्य केले. तसेच पत्नी अमृता फडणवीस यांच्याबद्दल बोलताना देवेंद्र फडणवीसांनी एक मिश्किल टिप्पणी केली.
एकनाथ शिंदेंसोबत सरकार स्थापनेवेळी देवेंद्र फडणवीस रात्री वेश बदलून भेटीगाठी घ्यायचे असा खुलासा अमृता फडणवीस यांनी केला होता. यानंतर राजकारण देखील चांगलेच तापले होते. विरोधकांनी फडणवीसांना लक्ष्य करत टीका केली होती. याबाबात महामुलाखतीत त्यांना विचारले असता देवेंद्र फडणवीसांनी मिश्किल टिप्पणी केली. देवेंद्र फडणवीस आगामी काळात कोणता चमत्कार करणार का? कारण वेश बदलून तुम्ही भेटीगाठी घ्यायचा असे अमृता फडणवीस यांनी सांगितले होते. या प्रश्नावर बोलताना उपमुख्यमंत्र्यांनी सावध प्रतिक्रिया दिली.
देवेंद्र फडणवीस म्हणाले की, मी वेश बदलून जायचो हे पत्नी अमृताने उघड केले. पण अशा गोष्टी उघड झाल्यामुळे राजकीय बाबतीत अडचणी निर्माण होतात. एवढी हिंमत नाही पण तिच्या तोंडाला चिकटपट्टी लावली तर बर होईल. कारण अशी सिक्रेट्स सांगितली तर अडचण होते. पण मला वाटते की, आता तो काळ गेला आताच्या घडीला कोणताही चमत्कार करण्याची आवश्यकता नाही.
"राहुल गांधींच्या लीडरशीपला श्रेय द्यायला हवे"दरम्यान, विजय दर्डा यांनी फडणवीसांना विचारले की, मागील वर्षी अभिनेते नाना पाटेकरांनी तुमची याच मंचावर मुलाखत घेतली होती. तेव्हा त्यांनी विचारले होते की, मतदार म्हणून आम्हाला काही किंमत आहे की नाही? तेव्हा तुमच्यासोबत फक्त एकनाथ शिंदे होते, आजकाल अनेक पक्षाचे नेते येत आहेत. यावर उत्तर देताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, "याचे सर्व श्रेय पंतप्रधान मोदीजींनी केलेल्या कामाला आणि थोडे श्रेय राहुल गांधींच्या लीडरशीपला दिले पाहिजे."
भाजपाच्या मतदारांना तुमची भूमिका पटेल का?भाजपाच्या मूळ मतदारांना तुम्ही घेतलेली भूमिका पटेल का? या प्रश्नावर देवेंद्र फडणवीस म्हणाले की, भाजपाने आपले स्वत्व सोडले तर ते मतदारांना आवडणार नाही. पण, आज वेगवेगळ्या पक्षाचे लोक आमच्यासोबत येऊन जय श्रीराम, भारत माता की जय म्हणत आहेत. त्यामुळे मतदारांना हे नक्कीच पटेल. ज्या लोकांनी तेव्हा आमच्या हिंदुत्वाला विरोध केला, तेच लोक आज आमचे हिंदुत्व स्वीकारत असतील, तर आमच्या मतदारांना नक्कीच त्याचा आनंद होईल, असेही फडणवीसांनी नमूद केले.