कांदिवली आगीतील पीडितांची सरकारकडून बोळवण
By admin | Published: December 10, 2015 02:18 AM2015-12-10T02:18:19+5:302015-12-10T02:18:19+5:30
‘दामूनगर आगीत खाक झाले असताना या सरकारला माणुसकी नाही,’ असा आरोप काँग्रेसचे सरचिटणीस सचिन सावंत यांनी केला. आज सायंकाळी त्यांनी या परिसराला भेट दिली.
मुंबई : ‘दामूनगर आगीत खाक झाले असताना या सरकारला माणुसकी नाही,’ असा आरोप काँग्रेसचे सरचिटणीस सचिन सावंत यांनी केला. आज सायंकाळी त्यांनी या परिसराला भेट दिली. ‘सरकार पीडितांना ३८०० रुपये देणार आहे. ही तुटपुंजी मदत हे पीडितांच्या तोंडाला पाने पुसण्यासारखे आहे. सरकार अशी मदत करून उद्ध्वस्त झालेल्यांची क्रूर थट्टा करत आहे,’ अशी टीका सावंत यांनी केली.
अग्निकांडाला तीन दिवस उलटूनही आगीत होरपळून मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबीयांना, जखमी आणि पीडितांना अद्यापही शासनाची कोणतीही मदत मिळालेली नाही. दोन दिवसांपासून स्थानिक पोलीस ठाणे, तहसीलदार, जिल्हाधिकारी, वनविभाग पालिका यांचे पंचनामे सुरू आहेत. भरघोस मदत मिळावी म्हणून मुख्यमंत्र्यांची भेट घेणार असल्याचे सावंत यांनी माध्यमांना सांगितले. (प्रतिनिधी)
ब्लँकेट्सचे वाटप
आगीत बेघर झालेल्यांना रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडिया आणि रिपब्लिकन बहुजन विद्यार्थी परिषदेच्या वतीने चादर आणि ब्लँकेट्सचे वाटप करण्यात आले. या वेळी रिपब्लिकन विद्यार्थी परिषदेचे महाराष्ट्र अध्यक्ष चंद्रशेखर कांबळे व युवक कार्यकर्ते उपस्थित होते.
भेट द्यायला मुख्यमंत्र्यांना
वेळ का नाही?
मालवणी दारूकांडात बळी पडलेल्यांच्या कुटुंबीयांना भेट द्यायला मुख्यमंत्र्यांना वेळ मिळाला नाही. आता अग्निकांडात हजारो कुटुंबांची वाताहत झालेली असतानाही पीडितांना भेट द्यायला त्यांच्याकडे वेळ नाही, अशी टीका काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली. मुख्यमंत्री पूर्णपणे असंवेदनशील असून, गरिबांशी त्यांना देणेघेणे नसल्याचा आरोप त्यांनी केला.