Join us

जोरात बोलल्याने तरुणावर हल्ला

By admin | Published: April 26, 2017 12:44 AM

मित्रांसोबत जोरात बोलणे एका तरुणाला भलतेच महागात पडले आहे. मित्रांसोबत बोलत असताना, बाजूला असलेल्या एका ग्रुपला

मुंबई : मित्रांसोबत जोरात बोलणे एका तरुणाला भलतेच महागात पडले आहे. मित्रांसोबत बोलत असताना, बाजूला असलेल्या एका ग्रुपला आपल्याला बघून शेरेबाजी करत असल्याचे वाटले. याच रागातून त्यांनी तरुणाला शिवीगाळ करत प्राणघातक हल्ला चढविला. सायन पोलिसांनी गुन्हा दाखल करत, नेरुळला नातेवाईकांच्या घरात लपून बसलेल्या तिघांना बेड्या ठोकल्या. राहुल पुरुषोत्तम शर्मा उर्फ छोटू (२३), सिद्धेश यशवंत टेमकर (२६), गंगाधर तुकाराम रहाटे (४७) अशी अटक आरोपींची नावे आहेत. सायन शिवाजीनगर परिसरात दिनेश शंकर कडव (३५) हा कुटुंबीयांसोबत राहतो. त्याची स्वत:ची व्यायाम शाळा आहे. २० एप्रिल रोजी सायंकाळी ४ च्या सुमारास तो दोन मित्रांसोबत सायन रुग्णालयाच्या समोरील हॉटेलकडे आले. तेथे दिनेशची मित्रांसोबत मस्ती सुरू होती. याच दरम्यान, दिनेश आपल्याकडे बघून बोलत असल्याचे शेजारी उभ्या असलेल्या तिघांना वाटले. तिघेही दारूच्या नशेत होते. त्यांनी दिनेशला शिवीगाळ केली. दोघांमध्ये शाब्दिक बाचाबाची वाढली. दिनेशने त्यांना समजाविले. ते तिघेही निघून गेले. १० मिनिटांनी हे त्रिकूट पुन्हा बाइकवरून आले. ‘हा.. बघ.. हा’ असे म्हणत त्यांनी दिनेशला मारहाण सुरू केली. त्याच्यावर चाकूने वार करण्यात आले. मित्रांनी त्याला वाचविण्याचा प्रयत्न केला. नागरिक जमताहेत पाहून त्रिकुटाने पळ काढला. दिनेशला तत्काळ सायन रुग्णालयात हलविण्यात आले. तेथे त्याच्यावर उपचार सुरू आहेत. या प्रकरणी सायन पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक लाड यांच्या मार्गदर्शनाखाली, सहायक पोलीस निरीक्षक संतोष गायकवाड यांच्या पथकाने दिनेशने केलेल्या वर्णनावरून आरोपींचा शोध सुरू केला. पोलीस अंमलदार राजेश सावंत, पंकज सोनावणे, धनराज पाटील महेंद्रसिंग पाटील हे तपास पथकात होते. तपासात हे तिघे सायनच्या भंडारवाडा परिसरात राहात असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार, पोलिसांनी त्यांचे घर गाठले. तेथून तिघेही बेपत्ता असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. आरोपींचे कुटुंबीयही त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत होते. मात्र, त्यांचा काहीच थांगपत्ता नसल्याचे समजले. पुढे चौकशीत पोलिसांनी त्यांचे नातेवाईक मित्रमंडळीकडे शोध घेतला. तपासात ही मंडळी नेरुळमध्ये लपून बसल्याचे समजताच, तेथून त्यांच्या मुसक्या आवळल्या. न्यायालयाने मंगळवारी या तिघांची त्यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत केली आहे. (प्रतिनिधी)