मनोहर कुंभेजकर, मुंबईकांदिवली पूर्वेकडील दामूनगरला लागलेल्या आगीतील पीडितांना केवळ ३ हजार ८०० रुपये देत, राज्य सरकारने त्यांची बोळवण केली आहे. या विरोधात पीडितांनी सरकारविरोधात ‘रास्ता रोको’ करत संताप व्यक्त केला आहे.गुरुवारी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास दामूनगर, भीमनगरमधील पीडितांनी आपातग्रस्त रहिवाशी संघातील रवी हिरवे, भागवत डावरे, लखन कटरमल, कैलास सहजराव, मनोज संगमनर यांच्या नेतृत्वाखाली रस्ता रोको केला, शिवाय तुटपुंजी मदतही नाकारली. यावर उपस्थित पोलिसांनी उपजिल्हाधिकाऱ्यांना घटनास्थळी येण्यास विनंती केली. उपजिल्हाधिकारी नवनाथ जरे यांनी पीडितांना शांत केल्यानंतर, परिस्थिती नियंत्रणात आली.३ हजार ८०० रुपयांची अर्थिक मदत उपनगर जिल्हाधिकाऱ्यांच्या आपत्कालीन निधीतून देण्यात आली आहे आणि त्यानंतर देण्यात येणारी आर्थिक मदत राज्य शासनाच्या निधीतून दिली जाईल, असे आश्वासन जिल्हाधिकाऱ्यांनी पीडितांना दिले. यावर पीडितांनी ही मदत स्वीकारली. दरम्यान, येथील १ हजार १०० पीडितांचे पंचनामे पूर्ण झाले आहेत. उर्वरितांचे पंचनामे एक दोन दिवसांत पूर्ण केले जातील, असेही जरे यांनी सांगितले. मदत केंद्र कक्षातून पीडितांना धनादेश देण्यात आले. गुरुवारी सायंकाळपर्यंत ५५० पीडितांना धनादेश वितरित करण्यात आले. शुक्रवारपर्यंत उर्वरितांनाही धनादेश वितरित करण्यात येतील.(प्रतिनिधी)>>> 25000रुपयांची मदत दामूनगरमधील प्रत्येक पीडित कुटुंबाला सरकारने किमान करावी, अशी मागणी माजी आमदार प्रवीण दरेकर यांनी केली. दुर्घटना घडलेल्या परिसरालगतच मुंबई बँकेची शाखा आहे. आधारकार्डांच्या आधारे या शाखेत संबधितांची खाती उघडली जातील. तेथे शासनाचे धनादेश जमा करण्याची व्यवस्था केली जाईल, असेही आश्वासनही दरेकर यांनी दिले आहे.
दामूनगरच्या पीडितांची ३८०० रुपयांत बोळवण
By admin | Published: December 11, 2015 1:53 AM