'स्पेशल २६' बनून आले अन् १८ लाखांची रोकड घेऊन गेले, मुंबईत नाट्यमय थरार!
By ऑनलाइन लोकमत | Published: December 6, 2023 12:29 PM2023-12-06T12:29:51+5:302023-12-06T12:30:52+5:30
'स्पेशल-२६' नावाच्या बॉलीवूड सिनेमाच्या कथानकासारखीच लुटची घटना मुंबईच्या सायन परिसरात उघडकीस आली आहे.
'स्पेशल-२६' नावाच्या बॉलीवूड सिनेमाच्या कथानकासारखीच लुटची घटना मुंबईच्या सायन परिसरात उघडकीस आली आहे. स्पेशल-२६ चित्रपटात एक टोळी सीबीआय अधिकारी, प्राप्तिकर अधिकारी असल्याचं भासवून घरातील मौल्यवान वस्तू तसेच रोकड घेऊन जात असल्याचं दाखवण्यात आलं आहे. त्याचपद्धतीनं नागरिकांच्या घरात शिरून लूट करणाऱ्या ८ जणांच्या टोळीला सायन पोलिसांनी पकडलं आहे. या टोळीनं सायन येथे एका घरातून तब्बल १८ लाख रुपयांची रोकड प्राप्तिकर अधिकारी असल्याचं सांगून जप्त केली. या टोळीनं याआधीही अशाच पद्धतीनं चोरी केली असल्याचंही तपासात पुढे आलं आहे.
सायन पूर्वेकडील प्रेमसदन इमारतीमध्ये राहणाऱ्या श्रीलता पटवा यांच्या घरी चार अनोळखी शिरले. एक तरुण इमारतीखाली देखरेख करण्यासाठी थांबला होता. चार तरुणांनी प्राप्तिकर अधिकारी असल्याचं बनावट ओळखपत्र दाखवलं आणि घरामध्ये असलेली रोख रक्कम काढण्यास सांगितलं. श्रीलता यांच्या कुटुंबीयांनी लग्नासाठी १८ लाख रुपये जमवून ठेवले होते. घराची झडती घेत असताना, या तोतया अधिकाऱ्यांच्या हाती ही रक्कम लागली. इतकी मोठी रक्कम कशी ठेवली? अशी विचारणा करीत ही रक्कम ताब्यात घेऊन चौघे निघून गेले. घरचे आल्यानंतर हा सर्व प्रकार श्रीलता यांनी सांगितल्यानंतर सायन पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात आली.
सायन पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षक मनीषा शिर्के यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू करण्यात आला असता संबंधित तरुण कोणतेही शासकीय अधिकारी नसल्याचं स्पष्ट झालं. श्रीलता पटवा यांना तोतया अधिकाऱ्यांनी फसवल्याचं निष्पन्न झालं. सायन पोलीस ठाण्याच्या विशेष पथकानं तपास करण्यास सुरुवात केली. सीसीसीटीव्ही फुटेज आणि इतर तांत्रिक पुरावे तपासले असता, त्यांनी वापरलेल्या इनोव्हा कारचा क्रमांक मिळाला. पोलिसांनी माहिती काढली असता, संबंधित कार सरिता मांगले यांच्या नावावर असल्याचं समजलं. सरिता मांगले यांची कार पती राजाराम मांगले वापरत असल्याचं समोर आलं. पोलिसांनी राजाराम याला ताब्यात घेऊन कसून चौकशी केली असता, संपूर्ण प्रकरणाचा भांडाफोड झाला. त्यान गुन्ह्याची कबुली देत साथीदारांची आणि मोडस ऑपरेंडीची सगळी माहिती पोलिसांना दिली. त्याने दिलेल्या माहितीवरून पोलिसांनी संतोष पटले, अमरदीप सोनावणे, भाऊराव इंगळे, सुशांत लोहार, शरद एकवडे, अभय कासले, रामकुमार गुजर यांना वेगवेगळ्या भागातून अटक केली आहे.