माता मृत्यू रोखण्यासाठी विशेष कृती आराखडा
By ऑनलाइन लोकमत | Published: December 22, 2019 06:02 AM2019-12-22T06:02:25+5:302019-12-22T06:02:30+5:30
राज्य शासनाचा निर्णय
मुंबई : राज्यातील माता मृत्यूंचे प्रमाण वाढत असल्यामुळे आता यावर नियंत्रण मिळविण्यासाठी राज्य शासनाच्या आरोग्य विभागाने पुढाकार घेतला आहे. माता मृत्यू रोखण्यासाठी विशेष कृती आराखडा तयार केला असून त्याअंतर्गत सर्व जिल्ह्यांतील आरोग्य विभागाला माता मृत्यू सनियंत्रण आराखडा तयार करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
राज्यातील माता मृत्यूचा दर हा एक लाख प्रसूतीमागे ६१ इतका आहे. २०२० अखेर हे प्रमाण प्रतिलाखामागे ३० एवढे कमी करण्याचे ध्येय आरोग्य विभागाने बाळगले आहे. प्रसूतीदरम्यान वाढणारा रक्तदाब, प्रसूतीपूर्व किंवा त्यानंतर होणारा रक्तस्राव, जंतूदोष या तीन आरोग्य समस्या मातेच्या मृत्यूस कारणीभूत ठरत असल्याचे या प्रकरणांच्या आढाव्यातून समोर येत आहे.
या तिन्ही समस्यांतून मातेला वाचवता येऊ शकते. यातून होणारे मृत्यू टाळण्यासाठी कुटुंब कल्याण कार्यालयातर्फे आरोग्य केंद्रातील उपचार व गर्भवतींची काळजी घेण्याच्या अनुषंगाने विविध उपाययोजना करण्याचे सुचविले आहे. माता मृत्यू कृती नियंत्रण आराखडा तयार करण्याचे आदेश जिल्हा शल्यचिकित्सक व जिल्हा आरोग्य अधिकारी यांना दिले आहेत.
माता मृत्यू दर कमी करण्यासाठी कुटुंब कल्याण विभागामार्फत आवश्यक कृती योजना तयार करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार, १२ आठवड्यांच्या आत गर्भवतींची नोंद करून त्यातील जोखीमग्रस्त भागातील मातांची वेगळी नोंद करणे. त्यांच्या आरोग्य स्थितीनुसार उपचारांची व्यवस्था करण्याच्या सूचना दिल्या आहेत. संबंधित भागातील आशा व आरोग्य सेवकांना गर्भवतींना प्रसूतीपूर्वी चार वेळा भेट देणे आवश्यक असल्याचे सांगण्यात आले आहे. या भेटीदरम्यान विविध तपासण्या व शारीरिक अवस्थेतील बदलांची माहिती जाणून घेऊन त्यानुसार समुपदेशन व सल्ला द्यावा, आदी सूचना दिल्या आहेत.