कारागृहात पदवी, पदव्युत्तर शिक्षण पूर्ण करणाऱ्या कैद्यांना विशेष माफी
By मनीषा म्हात्रे | Published: October 6, 2023 08:39 PM2023-10-06T20:39:43+5:302023-10-06T20:47:41+5:30
राज्यातील कारागृहात विविध गुन्ह्यातील बंदी शिक्षा भोगत आहेत.
मनीषा म्हात्रे, लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: राज्यातील कारागृहात विविध गुन्ह्यातील बंदी शिक्षा भोगत आहेत. कारागृहात पदवी, पदव्युत्तर शिक्षण पूर्ण करणाऱ्या कैद्यांना विशेष माफी देण्याचा निर्णय कारागृह प्रशासनाने घेतला आहे.
कारागृह विभागाने दिलेल्या माहितीनुसार, कारागृहात कैद्यांना व्यावसायिक प्रशिक्षण देवून त्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देण्यात येतात. शैक्षणिक कार्यक्रमाच्या माध्यमातून कैद्यांना सामाजिक जीवनाच्या अधिक चांगल्या व उपयुक्त मार्गासाठी शिक्षण देण्यात येते. कारागृहातून उच्च शिक्षण घेवून बंदी कारागृहातून सुटल्यानंतर समाजाने त्यांना सन्मानाने स्वीकारावे यासाठी महाराष्ट्र कारागृह विभाग, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, नाशिक, इंदिरा गांधी राष्ट्रिय मुक्त विद्यापीठ, नवी दिल्ली यांच्यामार्फत कैद्यांचे प्रलंबित शिक्षण पूर्ण करुन शैक्षणिक प्रवाहामध्ये आणण्याचे काम कारागृहातील अभ्यासकेंद्राव्दारे केले आहे.
कारागृहातून पदवी शिक्षण पूर्ण केल्यानंतर कैद्यांना विशेष माफी दिल्यास कुटुंबात लवकर परतता यावे यासाठी कारागृहामार्फत कैद्यांना ९० दिवसापर्यंत माफी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच, पदवी नंतर पदव्युत्तर पदवी घेतलेल्या कैद्यांना पुन्हा ९० दिवसापर्यंत माफी देण्यात यावी, असा निर्णय अपर पोलीस महासंचालक अमिताभ गुप्ता यांनी घेतला आहे.
१४५ कैद्यांना विशेष माफी
आतापर्यंत एकुण १४५ कैद्यांना ९० दिवस विशेष माफीचा लाभ घेतलेला आहे. यापैकी १४ कैद्यांना पदव्युत्तर शिक्षण पुर्ण केल्याने पुन्हा ९० दिवसाची माफी देण्यात आलेली आहे. कारागृहामध्ये कैद्यांच्या शिक्षणासाठी शिक्षण विभाग स्थापन करण्यात आला असून, राज्यातील एकूण ९ मध्यवर्ती व १ जिल्हा कारागृहामध्ये यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, नाशिक व इंदिरा गांधी राष्ट्रिय मुक्त विद्यापीठ, नवी दिल्ली यांची अभ्यासकेंद्रे सुरु करण्यात आली आहेत. शिक्षण विभागासाठी कारागृह विभागामार्फत शिक्षकांची नियुक्ती केलेली आहे. शिक्षकांमार्फत कैद्यांचे विद्यापीठाच्या अभ्यासकेंद्रातून प्रवेश प्रक्रिया पूर्ण केली जाते. सद्यस्थितीत येरवडा कोल्हापूर, नागपूर, अमरावती मुंबई तळोजा, ठाणे, औरंगाबाद, नाशिक या मध्यवर्ती कारागृह व कल्याण जिल्हा कारागृह अशा एकूण १० कारागृहात विद्यापीठाचे अभ्यासकेंद्र आहेत. शैक्षणिक अभ्यासक्रमात मुख्यतः सम्मानशास्त्र, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र, इतिहास, हिंदी, मराठी या विषयाची निवड करतात