Join us

‘महालक्ष्मी सरस'मध्ये गृहिणींची विशेष हजेरी; खाद्यभ्रंमतीला मिळतोय भरघोस प्रतिसाद

By स्नेहा मोरे | Published: December 29, 2023 8:56 PM

मांडे, धपाटे अन् थालीपीठ अन् वैविध्यपूर्ण खाद्यपदार्थांची पर्वणी

मुंबई - वांद्रे येथील एमएमआरडीए मैदानावर महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत सुरु असलेल्या महालक्ष्मी सरस २०२३-२४ या प्रदर्शनाला मुंबईकरांकडून भरभरुन प्रतिसाद मिळत आहे. या प्रदर्शनातील महिला - तरुणींची उपस्थिती लक्षवेधी आहे. तर केवळ खरेदीसाठी नव्हेच तर हे प्रदर्शन म्हणजे खाद्यभ्रंमतीसाठी पर्वणी असल्याने अगदी देशासह राज्याच्या कानाकोपऱ्यातील पदार्थांची चव चाखण्याकडे अनेकांचा कल आहे.

महालक्ष्मी सरस प्रदर्शनात अगदी गावरान जेवण, मसाले, पापड, चटण्या, मांडे, हुरडा अशा सहसा मुंबईत न मिळणाऱ्या पदार्थांवर ताव मारायला मुंबईकर आसुसलेले असतात. शिवाय घोंगडी, वेताच्या वस्तू, टेराकोटा, हातमागाच्या साड्या, पिशव्या, वेगवेगळे दागिने यांचीही वार्षिक खरेदी या प्रदर्शनात ठरलेली असते. इतकेच काय, गावरान आलं, कडधान्य, तांदूळ, पीठ, खवा यांनाही मोठी मागणी असते. राज्याच्या कानाकोपऱ्यातल्या महिला हे पदार्थ व वस्तू बनवत असतात, त्याचेही मोठे अप्रूप मुंबईकरांना असते. हे प्रदर्शन ७ जानेवारीपर्यंत सकाळी १० ते रात्री १० वाजेपर्यंत खुले आहे.

प्रदर्शनात राज्यातील नाशिक, कोल्हापूर, अहमदनगर , पुणे, सोलापूर , आसाम, पालघर, आंध्रप्रदेश, केरळ, यवतमाळ या आणि अशा वेगवेगळ्या राज्य आणि जिल्ह्यांतील कलाकारांचा समावेश आहे. या प्रदर्शनात फेरफटका मारताना ग्रामीण भागातून , वा बचत गटाच्या माध्यमातून शहरापर्यंत आपल्या पोटापाण्यासाठी आलेल्या कष्टाळू महिला हसतमुखपणे सर्वांचे स्वागत करताना दिसतात. याखेरीस, या प्रदर्शनांमध्ये मिळणाऱ्या वस्तू मुंबई वा इतर मोठ्या शहरांमध्ये सहसा उपलब्ध नसतात. त्यामुळे त्या घ्यायला मुंबईकर अधिक उत्सुक असतात.

फूड कोर्टमधील चविष्ट जेवण तर कुणालाही केव्हाही कुठेही आवडतेच, त्याच्याकडे कोणी पाठ फिरवत नाही. त्यातून स्वयंपाक करणारी हसतमुखाने करत असेल, मोकळ्या हाताने वाढत असेल, आणखी काही हवे का याची चौकशी करत असेल तर चार घास जास्तच जातात, असे काहीसे चित्र या ठिकाणी दिसून येते. सरसमध्ये महाराष्ट्राबाहेरच्याही बचत गटांचे स्टॉल आहेत. हिंदी वा मराठीचा गंधही नाही, तोडकेमोडके इंग्रजी जाणणाऱ्या दाक्षिणात्य महिलाही इथे येऊन स्टॉल लावतात. उत्पादन चांगले असेल, सुबक असेल तर माल लगेच संपतोही. एवढेच नाही, तर लोक संपर्क क्रमांक, वेबसाइट वगैरे विचारतात, पुढच्या वर्षी चौकशी असेल का अशी चौकशी करताना दिसून आले. अनेक बचत गट आता संकेतस्थळ सुरू करू लागलेत, जेणेकरून त्यांना वर्षभर विक्री करता येते, हे ही अधोरेखित करण्यासारखे आहे.

टॅग्स :मुंबईमहिला