नव्या विधानसभेत कोण येणार? कोण घरी बसणार..?

By अतुल कुलकर्णी | Published: July 14, 2024 06:57 AM2024-07-14T06:57:11+5:302024-07-14T06:57:43+5:30

ज्या मतदारांनी आपल्याला निवडून दिले त्यांच्यासाठी सांगण्यासारखी दहा कामे कोणती आहेत ?

Special Articel ON Who will be in the new assembly after the election Who will sit at home | नव्या विधानसभेत कोण येणार? कोण घरी बसणार..?

नव्या विधानसभेत कोण येणार? कोण घरी बसणार..?

अतुल कुलकर्णी
संपादक, मुंबई

चौदाव्या विधानसभेचे शेवटचे अधिवेशन शुक्रवारी पार पडले. नोव्हेंबरपर्यंत पंधरावी विधानसभा अस्तित्वात आली पाहिजे. दोन-तीन महिने निवडणुकीची धामधूम होईल. या विधानसभेच्या अधिवेशनातून बाहेर पडताना अनेक आमदारांच्या मनात, आपण इथे पुन्हा येऊ की नाही ? पुन्हा आलो तर सत्ताधारी बाकावर बसू की, विरोधी बाकावर ? असे प्रश्न मनात आले असतील. आपण आपापल्या मतदारसंघात परत जाल तेव्हा पाच वर्षांत आपण काय केले, याचा हिशेब जनतेला द्यावा लागेल. मतदाराला आपण राजा म्हणतो. तो मतदार तुमच्यासाठी प्रश्नांची भलीमोठी यादी घेऊन बसला आहे. जेव्हा तुम्ही त्याच्याकडे जाल, तेव्हा तो तुम्हाला प्रश्न विचारेल. सीईटी, नीट या परीक्षांचे पेपर फुटले तर पोरांचे पुढचे आयुष्य बरबाद व्हायला वेळ लागत नाही; मात्र तुम्हाला आम्ही मतदारांची प्रश्नपत्रिका देत आहोत. हा पेपर फुटला तरी त्यात तुमचे आणि जनतेचेच भले आहे. या प्रश्नांची उत्तरे तुम्ही आधी सोडवा. तुम्हाला किती मार्क मिळाले ते तपासून बघा...  मग मतदारांपुढे जा. ते तुमची परीक्षा घेणारच आहेत.

या पाच वर्षांत किती लोक आपल्या भेटीला आले ? किती लोकांची कामे आपण नि:स्वार्थ भावनेने केली ? किती लोकांच्या प्रश्नांवर आपण सहानुभूतीपूर्वक तोडगा काढला ? ज्या मतदारांनी आपल्याला निवडून दिले त्यांच्यासाठी सांगण्यासारखी दहा कामे कोणती आहेत ? आपण आपल्या मतदारसंघाचे सांस्कृतिक, साहित्यिक वातावरण टिकून राहावे म्हणून काय केले ? मतदारसंघात एखादे सुसज्ज नाट्यगृह उभारले का ? एखादा कला महोत्सव, साहित्यिक महोत्सव आपण घेतला का ? आपल्या मतदारसंघातल्या किती गावात गेल्या दोन-तीन वर्षांत जातीय तणाव निर्माण झाला ? तो संपवण्यासाठी आपण काय केले ? समाजा-समाजात तेढ निर्माण होत असताना ती कमी व्हावी, म्हणून आपण कोणती भूमिका घेतली ? अमूक काम होऊ शकते आणि एखादे होऊ शकत नाही, असे तुम्ही मतदारांना किती वेळा ठामपणे सांगितले..?


पाऊस आला की, रस्त्यावर खड्डे पडतात. सतत रस्त्याची कामं निघतात. गेल्या पाच वर्षांत ही कामे कोणत्या ठेकेदारांना दिली ? त्यांचे आपले संबंध होते का ? त्यांनी दरवर्षी काम निघेल अशी कामे का केली ? असेही प्रश्न लोक विचारतील. त्याची उत्तरं काय द्यायची हे माहिती असावे म्हणून, हे सगळे प्रश्न तुम्हाला देत आहे. गावात प्राथमिक आरोग्याच्या सुविधा नाहीत. शासकीय रुग्णालयात औषधे नाहीत. जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये चांगल्या सोईसुविधा नाहीत. पाचही वर्षांत मुलांना गणवेश आणि दप्तर वेळेवर मिळाले नाही. याविषयी आपण सरकारला कधी व कसा जाब विचारला? त्याची एखादी श्वेतपत्रिका आपण मतदारांना द्याल का ? असाही प्रश्न विचारला जाऊ शकतो. 


लोकांना पिण्याच्या पाण्याची अडचण होती. आपण त्यांच्यासाठी पाणी आणले की, निवडून येण्यासाठी पाण्यासारखा पैसा खर्च केला ? महागाई कमी होण्यासाठी तुम्ही काय प्रयत्न केले ? केजी, नर्सरीमध्ये ॲडमिशन घेण्यासाठी भरमसाठ पैसे द्यावे लागतात. हे थांबवण्यासाठी तुम्ही पाच वर्षांत काय केले ? गावात घराघरात एक तरी बेरोजगार तरुण फिरताना दिसतो. त्याच्या रोजगाराचे काय ? तुम्ही कोणत्या पक्षाचे हे महत्त्वाचे नाही. लोकांसाठी तुम्ही आमदारकीची शपथ घेतल्यापासून ते कालच्या शेवटच्या अधिवेशनापर्यंत तुम्ही त्यांचे प्रतिनिधी होता. त्यामुळे त्यांच्यासाठी काय केले हे त्यांना सांगावेच लागेल. ज्या पक्षात तुम्ही आहात, म्हणून लोकांनी निवडून दिले, तो पक्ष सोडून तुम्ही दुसऱ्याच पक्षासोबत गेलात. हा आमच्याशी केलेला विश्वासघात आहे, असे तुम्हाला कोणी विचारले तर? या प्रश्नाचेही उत्तर लोकांना द्यावे लागेल. १४ वी विधानसभा ही प्रत्येक पक्षाला सत्ताधारी आणि विरोधक अशा दोन्ही भूमिका पार पाडू देणारी होती. या पाच वर्षांत तुम्ही सत्ताधारी होता आणि विरोधकही..! म्हणूनच तुमच्याकडून या सगळ्या प्रश्नांची उत्तरे अपेक्षित आहेत...

पाच वर्षांत तुम्ही भरपूर काम केले आणि लोकांचे प्रश्नही भरपूर वाढले. या दोन्हीचा ताळमेळ तुम्ही तुमच्या मतदारसंघापुरता कसा साधला ? याचेही उत्तर तयार ठेवा. पाच वर्षांत तुमची स्वतःची व्यक्तिगत प्रगती किती झाली ? तुमच्याकडे चल अचल संपत्ती किती आली ? हे शपथपत्रातून लोकांना कळेलच... पण या प्रश्नांची उत्तरे शपथपत्रातून मिळणार नाहीत. ती  तुम्हालाच द्यावी लागतील. हा गेस पेपर समजा आणि वेळ आहे, तोपर्यंत तयारी करून ठेवा. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा.
- तुमचाच, बाबूराव

Web Title: Special Articel ON Who will be in the new assembly after the election Who will sit at home

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.