महेश झगडे, माजी सनदी अधिकारी |
महाराष्ट्रामध्ये गणेशोत्सव, नवरात्र, दिवाळी अशा उत्सवांचा आणि सणासुदींचा हंगाम सुरू होत आहे. दरवर्षीप्रमाणे हे एक आनंदोत्सवाचे पर्व असून, यावर्षी त्यामध्ये विधानसभेची सार्वत्रिक निवडणुकीची भर पडणार आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वसामान्यांना उत्सव साजरे करण्याकरिता शासनाकडून आणि उमेदवारांकडून अर्थबळसुद्धा मिळेल, असे दिसते. अर्थात, हे सर्व होत असताना या आनंदाच्या क्षणी मिठाईचे सेवन आणि त्याची आप्तेष्ट आणि मित्रमंडळींमध्ये देवाण-घेवाण हा एक अविभाज्य भाग बनतो. मुळात मिठाईमुळे मानवाचा आनंदी निर्देशांक वाढतो, यात दुमत नाही; पण असे असले तरी सध्याच्या लाइफस्टाइलमुळे अन्न आणि मिठाईमधून मिळणारे उष्मांक (कॅलरीज) सर्वसामान्यपणे आवश्यकतेपेक्षा जास्त असतात आणि त्यामुळे लठ्ठपणा वाढून त्याबरोबर अनेक व्याधी येतात हेसुद्धा सत्य आहे. विशेषतः ऑगस्ट ते डिसेंबर या हंगामात मिठाईद्वारे होणाऱ्या उष्मांकांचा भडिमार इतका असतो की, अनेक व्यक्तींचे वजन वाढते आणि ते पुन्हा आटोक्यात आणणे कठीण होते. त्यामुळे मिठाई सेवनाद्वारे आनंदोत्सव साजरा करताना आपण उष्मांकाच्या आक्रमणामुळे काही व्याधी तर वाढवून घेणार नाही ना, याचेसुद्धा भान ठेवणे तितकेच गरजेचे असते.
मिठाईमधून मिळणाऱ्या अतिरिक्त उष्मांकाव्यतिरिक्त आणखी काही बाबी अशा आहेत की, त्यामुळे मानवी आरोग्य धोक्यात येऊ शकते. त्यापैकी एक बाब म्हणजे मिठाईमधील भेसळ. माणसाने अन्न आणि मिठाईमधून किती उष्मांक घ्यावेत जेणेकरून त्याचे आरोग्य चांगले राहील याबाबत कोणतेही नियम नसले तरी अन्न आणि मिठाईमधून भेसळमुक्त पदार्थ शरीरात जाऊन अपाय होऊ नये म्हणून शासनाने त्यासाठी कठोर कायदे, नियम केलेले आहेत; तसेच त्यांची अंमलबजावणी करण्याकरिता देशपातळीवरून स्थानिक पातळीपर्यंत अवाढव्य शासकीय यंत्रणा उभारली असून, त्यावर मोठ्या प्रमाणात खर्चदेखील करण्यात येतो. महाराष्ट्रात त्यासाठी अन्न सुरक्षा आयुक्तांबरोबरच ९० सहायक आयुक्त, ३५० अन्न सुरक्षा अधिकारी आदींचा ताफा आहे. जर कोणी भेसळयुक्त अन्न किंवा मिठाई बाजारात आणून त्याची विक्री करीत असेल किंवा त्याची वाहतूक करीत असेल तर त्यास दंड किंवा शिक्षा करण्याच्या तरतुदी आहेत आणि या तरतुदींद्वारे भेसळ प्रतिबंध करण्याची जबाबदारी संबंधित शासकीय यंत्रणेवर टाकण्यात आलेली आहे. हे सर्व असताना मिठाईमध्ये भेसळ होत नाही का, असा प्रश्न स्वाभाविकपणे निर्माण होतो; पण त्याचे उत्तर सोपे आहे ते म्हणजे ही भेसळ होतेच. मग अशी भेसळ होत असेल तर त्यासाठी देशपातळीवर असलेली भारतीय खाद्य सुरक्षा आणि मानके प्राधिकरण, राज्यपातळीवरील सुरक्षा आयुक्त, संबंधित खात्यांचे केंद्रातील आणि राज्यातील सचिव, जिल्हास्तरावरील सह आयुक्त आणि स्थानिक स्तरावरील प्राधिकृत अधिक रयत अधिकारी व अन्नसुरक्षा अधिकारी हे फक्त दरमहा पगार घेण्यासाठीच आहेत किंवा कसे? असा प्रश्न निर्माण होतो.
सणासुदीचा हंगाम सुरू झाल्यानंतर खवा, तेल, तूप अशा स्वरूपाच्या काही भेसळमुक्त पदार्थांवर तोंडदेखल्या कारवाया करून आपण काहीतरी करीत आहोत असा देखावा निर्माण करणारे अधिकारी म्हणजे शासकीय यंत्रणेतील एकप्रकारची भेसळच समजायला हवी.हे सर्व असले तरी ग्राहकांनी त्यांचे स्वास्थ्य भेसळयुक्त पदार्थांमुळे बिघडू नये म्हणून काही काळजी घेणे गरजेचे आहे. मिठायांतील तुपामध्ये उकडलेले बटाटे किंवा रताळे टाकून भेसळ केली जाते. ही ओळखण्यासाठी एका ग्लासमध्ये अर्धा चमचा तूप घेऊन त्यावर दोन ते तीन चमचे आयोडीन टाकले आणि त्याचा रंग निळा झाला तर त्यामध्ये भेसळ आहे, हे निश्चितपणे समजावे. खव्यामधील भेसळही अशीच तपासता येते. आटा किंवा मैद्यातील वाळू आणि मातीची भेसळ ओळखण्यासाठी एका काचेच्या वाटीमध्ये पीठ घ्यावे व त्यामध्ये सूक्ष्म निरीक्षण करून काही वाळूचे कण, कीटकांचे अवशेष, बारीक तंतुमय पदार्थ असे प्रकार आढळल्यास त्यात भेसळ असण्याची शक्यता असते. असे अनेक प्रकार आहेत की, ज्यामुळे अन्न भेसळ घरातल्या घरात प्राथमिकदृष्ट्या समजून येते. अन्नपदार्थांतील भेसळ ओळखण्यासाठी केंद्र शासनाच्या www.fssai.gov.in या संकेतस्थळावर विस्तृत माहिती दिलेली आहे. तिचा वापर करण्याची सवय ठेवावी; पण जर आपणास जागरूक नागरिक किंवा ग्राहक म्हणून वावरावयाचे असेल तर एखाद्या अन्नपदार्थांबाबत शंका निर्माण झाल्यास तातडीने आपल्या क्षेत्रातील अन्नसुरक्षा अधिकाऱ्यास पाचारण करून त्यांना अन्न नमुने घेण्याचे सूचित करावे. ती त्यांची जबाबदारी आहे. अर्थात, अन्न नमुने तपासण्यासाठी नाममात्र फी घेतली जाते आणि अन्नात जर भेसळ आढळली तर ती फीसुद्धा परत केली जाते. दुर्दैवाने या तरतुदीचा ग्राहकाकडून वापर होत नसल्याने भेसळ करणाऱ्यांचे फावते आणि मग ते बिनदिक्कतपणे पुढेही भेसळ करीत राहतात.
या आनंदोत्सवाच्या हंगामामध्ये आपण निरोगी आणि भेसळमुक्त मिठाई सेवन करूया, असा निग्रह सर्वांनी मनाशी केला आणि शासकीय यंत्रणेला कामाला लावले तर मला वाटते हा खरा आनंदोत्सव असेल. अद्यापही वेळ गेलेली नाही.