विशेष लेखः ...अन् 'सह्याद्री'ऐवजी 'वर्षा' बंगलाच झाला मुख्यमंत्र्याचं निवासस्थान; बारशाचीही रंजक गोष्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: December 5, 2019 04:11 PM2019-12-05T16:11:41+5:302019-12-05T16:12:28+5:30

मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर श्री. नाईक यांनी वर्षा बंगल्यातील वास्तव्य हलविलं

Special article: ... instead of 'Sahyadri', 'Varsha' bungalow becomes the residence of the Chief Minister Maharashtra | विशेष लेखः ...अन् 'सह्याद्री'ऐवजी 'वर्षा' बंगलाच झाला मुख्यमंत्र्याचं निवासस्थान; बारशाचीही रंजक गोष्ट

विशेष लेखः ...अन् 'सह्याद्री'ऐवजी 'वर्षा' बंगलाच झाला मुख्यमंत्र्याचं निवासस्थान; बारशाचीही रंजक गोष्ट

googlenewsNext

जगदीश त्र्यं. मोरे

मुंबई -  मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान असलेला वर्षा बंगला सत्ता बदलानंतर नेहमीच चर्चेत येतो. मुळात तो बंगला पूर्वी मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान नव्हते आणि त्याचे नावही ‘वर्षा’नव्हते. त्याचा संदर्भ माजी मुख्यमंत्री (कै.) श्री. वसंतराव नाईक यांच्याशी संबंधित आहे. ते पहिल्यांदा मुख्यमंत्रीपदी आजच्याच दिवशी 5 डिसेंबर 1963 रोजी विराजमान झाले होते. त्यानिमित्ताने हे एक स्मरण... 

शेतकऱ्याला पाणी मिळालं की, तो चमत्कार करून दाखवितो हा सिद्धांत मांडणारे व तो प्रत्यक्षात आणण्यासाठी सतत झटणारे मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांनी 20 फेब्रुवारी 1975 रोजी सत्तेची कवचकुंडले शांतपणे खाली ठेवली आणि त्यांचा एकोणवीस वर्षांचा ‘वर्षा’ बंगल्यावरील प्रदीर्घ रहिवास संपुष्टात आला. त्यांच्या हितचिंतकांपैकी कोणीतरी त्यांना सहज म्हणाले, “साहेब, बंगला सोडण्याची एवढी घाई का करता? थोडे दिवस थांबा कदाचित तुम्हाला पुन्हा निमंत्रण येईल...” बोलणाऱ्याच्या मनातील निर्मळ भावना लक्षात घेऊन श्री. नाईक म्हणाले, “आता ते होणे नाही... आता कोणी आग्रह केला तरी माझा बेत बदलणार नाही- आय हॅव प्लेड माय इनिंग फॉर अ हेअरली लाँग पिरिय्‌ड. आय वॉज ऑन द ग्राऊंड. आता पुरे!” 

श्री. नाईक यांच्या ‘दूत पर्जंन्याचा’ या चरित्रातील हा संवाद महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचं निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्याचं स्थानमहात्म्य अधोरेखित करतो. प्रसिद्ध साहित्यिक मधु मंगेश कर्णिक यांनी हे चरित्र लिहिलं आहे. ते मुख्यमंत्र्यांचे प्रसिद्धी अधिकारी म्हणून काम पाहत असत. श्री. कर्णिक यांनी ‘दूत पर्जन्यां’द्वारे श्री. नाईक यांच्या जीवनाचे विविध पैलू उलगडून दाखविले आहेत. त्यातच ‘वर्षा’ बंगल्याचं कूळ आणि मूळही लक्षात येतं. श्री. नाईक मुख्यमंत्री होईपर्यंत हा बंगला कधीच मुख्यमंत्र्यांचा नव्हता आणि ते द्विभाषिक राज्याचे मंत्री होईपर्यंत त्याचे नावही ‘वर्षा’ नव्हतं. 

श्री. नाईक यांचा जन्म यवतमाळ जिल्ह्यातील गहुलीचा. 1952 मधील पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीत ते पुसद मतदारसंघातून मध्य प्रांताच्या विधानसभेवर निवडून गेले आणि महसूल खात्याचे उपमंत्री झाले. राज्य पूनर्रचनेनंतर 1956 मध्ये विदर्भाचा समावेश मुंबई प्रांतात झाला. या द्विभाषिक राज्याच्या मुख्यमंत्रीपदी श्री. यशवंतराव चव्हाण विराजमान झाले. त्यांच्या मंत्रिमंडळात श्री. नाईक यांनाही स्थान मिळालं. मध्य प्रांतात महसूल आणि सहकार मंत्री राहिलेले श्री. नाईक मुंबई प्रांतात कृषिमंत्री झाले. त्यांना त्यांच्या जिव्हाळ्याचं खातं मिळालं. 

श्री. नाईक यांच्या वाट्याला मंत्री म्हणून ‘डग बीगन’ नावाचा इंग्रजी आमदानीतला बंगला आला. सरकारनं दिला तो बंगला त्यांनी स्वीकारला. ते मुळातच हौशी स्वभावाचे होते. त्यांच्या पत्नी वत्सलाबाईंनाही टापटीपीनं राहण्याची आवड होती. तसा हा बंगला अगदीच साधा होता. बैठी बांधणी, सगळीकडून मोकळे दरवाजे आणि खासगीपणा नाही. वत्सलाबाईंना क्षणभर वाटलं, “सर्वांनी नाकारलेला हा बंगला आपल्या वाट्याला तर आला नाही ना? शेजारचा मुख्यमंत्र्यांचा सह्याद्री हा बंगला केवढा भव्य! त्याच्या मागील सौधावर उभं राहिलं की मरीन लाईन्सचा ‘नेकलेस ऑफ बाँम्बे क्वीन’ कसा रात्री झगमगतांना दिसतो. चौपाटीवर समुद्राच्या लाटा कशा उसळतांना दिसतात. त्याच्या विस्तीर्ण आवारात कशी सुंदर झाडं आहेत. त्याची बाग किती सुरेख आहे! त्या मानानं डग बीगन अगदीच साधा आहे.”

श्री. नाईक म्हणाले, “छान आहे हे घर. याला एक घरंदाजपणा आहे.” ते खरंच होतं. वर्षा बंगल्यामध्ये येणाऱ्या अभ्यगताला परकेपणा वाटेल, अशी औपचारिकता नव्हती. त्याला घराचा मोकळेपणा होता. मुलगा अविनाशच्या वाढदिवशी 7 नोव्हेंबर 1956 रोजी नाईक कुटुंब डग बीगनवर राहायला आले. श्री. नाईक यांचा पाऊस हा अत्यंत जिव्हाळ्याचा विषय होता. कवी पांडुरंग श्रावण गोरे यांची ‘शेतकऱ्यांचे गाणे’ ही अत्यंत आवडीची कविता होती. त्यामुळे आल्या दिवशीच श्री. नाईक यांनी ‘डग बीगन’चं नामांतर ‘वर्षा’ असं केलं. वर्षाच्या आवारात त्यांनी आंबा, लिंब, सुपारी आदी विविध झाडे लावली. ते माळ्याला म्हणायचे, “मी झाडं लावीन ती माझ्यासाठीच आहेत, असं समजू नकोस. पुढील काळात ती कुणालाही उपयोगी पडायला हवीत.” 

मुख्यमंत्री दादासाहेब कन्नमवार यांच्या आकस्मिक निधनानंतर श्री. नाईक यांच्यावर राज्याची जबाबदारी आली. 5 डिसेंबर 1963 रोजी त्यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांबरोबर पहिली बैठक संपवून श्री. नाईक वर्षा बंगल्यावर आले. तेव्हा त्यांचे मोठे बंधू बाबासाहेब त्यांची वाट पाहत होते. ते म्हणाले, “शेवटी या वर्षा बंगल्यालाच मुख्यमंत्र्यांचा बंगला म्हणून नाव लौकीक मिळणार असं दिसतं.” “होय, बाबासाहेब! छप्पन्न साली आम्ही आपल्या मोठ्या बाबाच्या- अविनाशच्या सहाव्या वाढदिवशी वर्षावर राहयला आलो. तेव्हापासूनचे सारे दिवस- फक्त गेलं वर्ष वगळता- सुखाचे गेले.” श्री. नाईक यांनी स्पष्ट केलं. 

दोघा भावांच्या संभाषणात वत्सलाबाईदेखील सहभागी झाल्या. त्या म्हणाल्या, “आता तर आम्ही इथं रूढलोच आहोत. आता सह्याद्री नको की विंध्याद्री नको! आपण इथं खूष आहोत...” वसंत, वत्सला आणि वर्षा- ‘व’ अक्षरानं सुरू झालेली ही नावं आहेत. खरंच वर्षा बंगला आपल्याला भाग्याचा ठरेल? याच बंगल्यात आपलं गेलं वर्ष फक्त वाईट गेलं ते 1962 चं साल. त्याच वर्षी आपली एकुलती एक लाडकी बेबी आपल्याला सोडून गेली, हे विचारही वत्सलाबाईंच्या मनात डोकावून गेले. “वत्सलाबाईंच्या मनात वर्षा बंगल्यात बऱ्याच सुधारणा करायचं होतं; पण श्री. नाईक यांचा सौम्य विरोध होता. ते म्हणतं, आपण काय आज मंत्री आहोत. उद्या कदाचित नसूही. आपल्या खातर सरकारवर खर्चाचा बोजा नको.”

पंडित जवाहरलाल नेहरू 1964 मध्ये मुंबईत राजभवनात मुक्कामाला होते. त्यांच्या भगिनी विजयालक्ष्मी पंडित महाराष्ट्राच्या राज्यपाल होत्या. श्री. नाईक यांनी पंडितजी आणि विजयालक्ष्मी यांना आपल्या घरी भोजनाचं निमंत्रण दिलं. ते त्यांनी स्वीकारलं होतं. वर्षा बंगल्याच्या हिरवळीवर डीनरची व्यवस्था करण्यात आली होती.  पुणे येथे 3 ऑक्टोबर 1965 रोजी श्री. नाईक यांनी शनिवारवाड्यासमोरील सभेत एक ऐतिहासिक घोषणा केली होती. ते म्हणाले होते, “दोन वर्षांमध्ये महाराष्ट्र अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण झाला नाही तर मला या शनिवारवाड्यासमोर फाशी द्या.” ही घोषणा बरीच गाजली. ती सत्यात उतरविण्यासाठी त्यांनी अपार मेहनत घेतली. 1957 च्या मंत्रिमंडळात त्यांच्याकडे कृषीबरोबरच दुग्धविकास खात्याचाही पदभार होता. आरेचा सर्वांगीण विकास कार्यक्रम त्यांनीच सर्वप्रथम हाती घेतला होता. मुंख्यमंत्री म्हणून पंचायत राजची प्रभावी अंमलबजावणी, कापूस एकाधिकार योजना, रोजगार हमी योजना, कोयना भूकंपग्रस्तांचे पुनर्वसन, विधानसभा आणि विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेत्याला कॅबिनेट मंत्री पदाचा दर्जा, कृषी विद्यापीठांची स्थापना, जिल्हा नियोजन मंडळांची निर्मिती आदीं असंख्य ऐतिहासिक नोंदी श्री. नाईक यांची प्रभावशाली कारकीर्द दर्शवितात. वर्षा बंगलासुद्धा याचा साक्षिदार आहे.

मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर श्री. नाईक यांनी वर्षा बंगल्यातील वास्तव्य हलविलं; परंतु ‘वसंता’च्या हृदयातला ‘वर्षाऋतू’ कायम होता. शेतात राबणाऱ्या कास्तकारांचाच विचार सर्वप्रथम त्यांच्या मनात आला. त्यांनी आपला मुंबईतील मुक्काम हलविला आणि पुसद गाठलं; पण आजही मुख्यमंत्र्यांचा बंगला म्हणून ‘वर्षा’चं स्थानमहात्म्य कायम आहे. किंबहुना ते अधिक ठळक झालं आहे. 

(संदर्भ: श्री. कर्णिक मधु मंगेश, दूत पर्जन्याचा, वसंतराव नाईक, कृषिसंशोधन व ग्रामीण विकास प्रतिष्ठान, मुंबई, 1994, लोकराज्य, माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, मुंबई, डिसेंबर 2012) 
 

Web Title: Special article: ... instead of 'Sahyadri', 'Varsha' bungalow becomes the residence of the Chief Minister Maharashtra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.