Join us

कार्यकर्ते नाचात मग्न..पोलिस बंदोबस्तात व्यग्र..; पण कोणीही धन्यवाद देणार नाही

By अतुल कुलकर्णी | Published: September 13, 2024 6:11 AM

४८ तासांहून अधिक काळ ड्यूटीवरील पोलिसांना हवे आहे फक्त तुमचे स्माइल आणि थँक्यू

अतुल कुलकर्णीमुंबई - कमीत कमी २४ तास आणि जास्तीत जास्त ४८ तास विसर्जनाच्या मिरवणुकीत बंदोबस्तासाठी मुंबई, ठाणे, नवी मुंबई, मीरा-भाईंदर ही पोलिस आयुक्तालये आणि रायगड, पालघर, ठाणे ग्रामीण जिल्हा पोलिस प्रमुख यांच्या कार्यक्षेत्रात जवळपास ५० हजार अधिकारी पोलिस कर्मचारी रस्त्यावर तैनात आहेत. गणपतीचे विसर्जन, त्यासाठी लावला जाणारा बंदोबस्त स्वतंत्र अभ्यासाचा विषय ठरावा इतक्या गोष्टी पडद्याआड चालू आहेत. विसर्जन निर्विघ्न पार पडले तर कोणी धन्यवाद देणार नाही. मात्र दुर्दैवाने काही घडले की हेच पोलिस टीकेचे लक्ष्य ठरतील.

सगळ्यात जास्त गर्दी गिरगाव चौपाटीवर असते. त्या ठिकाणी विसर्जनाच्या दोन दिवस आधी गेल्यास पोलिसांचे कोणकोणत्या पातळीवर काम चालू आहे हे लक्षात येते. विसर्जन तारखेच्या महिनाभर आधी नियोजन सुरू होते. गणपती मंडळांसोबत त्या त्या पोलिस स्टेशनच्या बैठका घेण्यापासून सुरू झालेले काम, विसर्जनाच्या दिवशी ड्यूटीवर असणाऱ्या पोलिसांच्या खाण्या-पिण्याची सोय बघेपर्यंत चालते. या काळात मोठ्या प्रमाणावर स्वयंसेवकांना प्रशिक्षण दिले जाते, धोके निर्माण होऊ नयेत म्हणून गर्दीवर नियंत्रण ठेवण्याचे मोठे काम पोलिसांना करावे लागते.

पोलिसांना प्रोत्साहन द्यायचे असते. त्यासाठीचे वातावरण तयार करावे लागते. वरिष्ठांनी त्यांच्या सहकारी पोलिसांना तुम्ही चांगले काम केले असे सांगितले तरी ते पुरेसे असते. गणेशोत्सवासारखा सण दहा दिवस असतो. वेगवेगळ्या दिवशी गणेश विसर्जन होत असते. लोक देखावे, गणपती पाहायला बाहेर पडतात, तेव्हा त्यांना सुरक्षाही द्यावी लागते. हे काम विना तक्रार पोलिस करतात. त्यांना जसे प्रोत्साहन मिळायला हवे तसेच ज्या नागरिकांसाठी ते अहोरात्र काम करतात त्यांनी एक स्माईल दिले, थँक्यू म्हटले तरी ते पुरेसे होते, असे एक वरिष्ठ अधिकारी सांगत होते.

विसर्जनाच्या मिरवणुकीत कुठलाही वाईट प्रकार घडू नये, यासाठी पोलिसांना मात्र डोळ्यात तेल घालून लक्ष ठेवावे लागते, असे सांगून मुंबईचे विशेष पोलिस आयुक्त देवेन भारती म्हणाले, या दिवसात हजारो पोलिसांना वेळेपेक्षा जास्त काम करावे लागते. मात्र विनातक्रार सगळे काम करतात. त्यांच्यामुळे विसर्जन निर्विघ्नपणे पार पडते. तर अनेक भागात लोक स्वतःहून बंदोबस्तावर असणाऱ्या पोलिसांच्या खाण्या-पिण्याकडे लक्ष देतात. मुंबईकरांचे हे स्पिरिट कौतुकास्पद असल्याची भावना सहपोलिस आयुक्त सत्यनारायण चौधरी यांनी बोलून दाखवली. मुंबईत लालबागच्या राजापासून, सिद्धिविनायकापर्यंत व्हीआयपींच्या फेऱ्या वाढल्या आहेत. लोकांमध्ये नाराजी येऊ न देता अशा लोकांना दर्शन घडवून आणायचे आणि सर्वसामान्यांनाही त्याचा त्रास होऊ द्यायचा नाही, ही तारेवरची कसरतही पोलिस पार पाडत आहेत. 

‘लोकमत’ची भूमिकादर्शनाला गेल्यानंतर किंवा विसर्जन मिरवणुकीत तुम्हाला अनेक ठिकाणी पोलिस दिसतील. ते किती तास काम करत आहेत हे त्यांना विचारा. त्यांना धन्यवाद द्या. तुमचे स्मितहास्य आणि तुमचा छोटासा थँक्यू त्यांना पुढे काही तास बंदोबस्त करण्यासाठी दिलासा देईल.

टॅग्स :मुंबई पोलीसगणेशोत्सव 2024गणेशोत्सव