Join us

शरद पवारांनी रा.सू. गवईंचा पानाचा डबा मागवला तेव्हा... 

By अतुल कुलकर्णी | Published: March 05, 2023 7:36 AM

अधिवेशनाच्या काळात, विधानभवनाच्या इमारतीत विधानसभा आणि विधान परिषदेच्या लॉबीमध्ये मित्रत्व, आपुलकी, स्नेह यांचे अनोखे दर्शन घडायचे...

अतुल कुलकर्णी, संपादक, मुंबई एकमेकांना पाण्यात पाहणाऱ्या नेत्यांनो, उद्धव ठाकरेएकनाथ शिंदे यांना बोलावून घ्यायचे... एकनाथ शिंदे आदित्य यांच्यासोबत विविध विषयांवर गप्पा मारायचे... देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे अधून-मधून पोहे खायला जमायचे... नवाब मलिक-एकनाथ शिंदे यांचेही एकमेकांशी सख्य होते... अधिवेशनाच्या काळात, विधानभवनाच्या इमारतीत विधानसभा आणि विधान परिषदेच्या लॉबीमध्ये मित्रत्व, आपुलकी, स्नेह यांचे अनोखे दर्शन घडायचे... सभागृह आणि सभागृहाच्या बाहेरील पॅसेज यांच्यामध्ये एक मोकळी स्पेस असते. त्याला लॉबी म्हणतात. त्या लॉबीत सर्वपक्षीय नेत्यांच्या गप्पा रंगायच्या. त्या गप्पा महाराष्ट्राच्या राजकारणाचा अर्क होता. सभागृहात एकमेकांवर तुटून पडणारे भिन्नपक्षीय नेते लॉबीमध्ये आले की, एकमेकांना वेगवेगळे पदार्थ खायला द्यायचे. विरोधी पक्षाच्या नेत्याने आणलेले पराठे किंवा थालीपीठ सत्ताधारी कौतुकाने खायचे..! सत्ताधारी बाकावरील एखादा मंत्री त्यांच्या दालनात जेवणाचं निमंत्रण द्यायचा. तुम्हाला काय आवडेल, असेही विचारायचा.

अशा शेकडो उदाहरणांनी विधिमंडळाचा इतिहास लिहिला जावा, इतक्या चांगल्या गोष्टी या लॉबीत घडल्या आहेत. पाशा पटेल लातूरहून येताना धपाटे आणि शेंगदाण्याची चटणी घेऊन यायचे. लॉबीमध्ये सर्वपक्षीय पंगत झडायची. गिरीश बापट तर सतत काही ना काहीतरी खायला घेऊन यायचे. दिवाकर रावते आणि पाशा पटेल यांच्यामधील सर्वधर्मीय संवाद थोडा कटुतेच्या दिशेने चालला असं वाटले की, मध्येच कोणीतरी येऊन हस्तक्षेप करायचा... क्षणात लॉबीमध्ये हास्यकल्लोळ व्हायचा... वसंतराव काळे आमदार असताना लॉबीत सतत काहीतरी खायला घेऊन यायचे. हीच परंपरा त्यांच्या मुलाने, विक्रम काळे यांनी कायम ठेवली... 

गोपीनाथ मुंडे आणि विलासराव देशमुख यांच्यामधील शाब्दिक जुगलबंदी सभागृहापेक्षा लॉबीमध्ये जास्त चालायची... आपण एकमेकांच्या विरुद्ध एवढं बोलतो, त्यामुळं चॅनेलवाल्यांचा टीआरपी वाढतो. म्हणून त्यांनी आपल्याला रॉयल्टी दिली पाहिजे, कोणीतरी सभागृहात तशी मागणी करा, असे दिलखुलास हसत विलासराव देशमुख यांनी सांगितल्याचे, लॉबीच्या भिंतींना आजही आठवत असेल... दिलीप सोपल बार्शीचे आमदार होते. सभागृहापेक्षा लॉबीत त्यांची मैफल जमायची... अनेकदा सभागृह रिकामे आणि लॉबी फुलून गेलेली असायची. अनेकदा हास्यविनोद सभागृहात ऐकू यायचे. तेव्हा अध्यक्षांना लॉबीत शांतता ठेवा, असाही आदेश द्यावा लागत असे... रा. सू. गवई यांच्याकडे पानाचा डबा असायचा. शरद पवार लॉबीत आले की गवई कुठे आहेत, अशी विचारणा करायचे... याचा अर्थ त्यांना पानाचा डबा हवा असायचा. मग तो डबा सगळ्या लॉबीत फिरत राहायचा. सभागृहात कोणाची चर्चा रंगली, हे त्या डब्यावरून कळायचे...दिलीप वळसे-पाटील विरोधी पक्षात आणि भाजपचे प्रकाश मेहता गृहनिर्माण मंत्री. सहसा मंत्र्यांना भेटायला त्यांच्या दालनात जावे, असा संकेत आहे, पण हा संकेत बाजूला सारून प्रकाश मेहता अनेकदा दिलीप वळसे पाटलांच्या केबिनमध्ये  जेवायला जायचे. त्या ठिकाणी गप्पांची मैफल जमायची. केवळ खाणे-पिणे आणि गप्पांची मैफल एवढेच लॉबीत होत नसे. अनेकदा विरोधी आमदार पोटतिडकीने आपल्या मतदारसंघातील विकासाचे प्रश्न मंत्र्यांना लॉबीमध्ये समजावून सांगायचे. मंत्रीदेखील तुम्ही मला अमुक अमुक प्रश्न विचारा, मी त्याचे सकारात्मक उत्तर देतो, असे सांगायचे. लॉबीत ठरलेली ही ‘स्ट्रॅटेजी’ सभागृहात जशास तशी उतरायची... त्या आमदाराने मांडलेला प्रश्न मार्गी लागायचा. कित्येकदा विलासराव देशमुख मराठवाड्यातल्या आमदारांना सांगायचे, तुम्ही सभागृहात गदारोळ करा...

मराठवाड्यातल्या प्रश्नांवरून मला जाब विचारा... म्हणजे मराठवाड्यातल्या आमदारांचा दबाव आहे, असे सांगून मला मराठवाड्याची काही कामे मार्गी लावता येतील. विलासरावांचं लॉबीतलं हे आवाहन सर्वपक्षीय सदस्य सभागृहात नेटाने पूर्ण करून दाखवायचे.

पण हा झाला इतिहास. आता भारत-पाकिस्तान युद्धासारखी स्थिती अनेकदा लॉबीत दिसते. सत्ताधारी आणि विरोधक आमदार एकमेकांना समोरून शत्रू चाल करून येत असावा, या भावनेने बघतात. विरोधकांनी मांडलेल्या प्रश्नाला केराची टोपली दाखवतात. विरोधी आमदारानं प्रश्न मांडायचा प्रयत्न केला, तर तो आपल्या पक्षात येऊ शकतो का, याचा आधी अंदाज घेतला जातो. तो येऊ शकत असेल तरच त्याच्या प्रश्नाला महत्त्व मिळते. लॉबीमध्ये रंगणाऱ्या गप्पा जवळपास नाहीशा झाल्या आहेत. आपापल्या गटाचे कोंडाळे केलेली नेतेमंडळी दिसतात. त्याचे पडसाद आता अधिकाऱ्यांमध्येही उमटत चालले आहेत. अधिकाऱ्यांचेही पक्षनिहाय गट होऊ लागले आहेत. 

आज खऱ्या अर्थाने कटुता, द्वेष, एकमेकांचे पाय खेचणे अशा वृत्तीची होळी पेटवण्याची वेळ आली आहे. कितीही राजकीय वादविवाद झाले तरी सभागृहाबाहेर पडल्यावर एकमेकांच्या गाडीत बसून जाणारे नेते आता दुर्मीळ होत चालले आहेत. महाराष्ट्र असा कधीही नव्हता..! शाहू, फुले, आंबेडकरांचा वारसा असणारा महाराष्ट्र सर्वांना एकोप्याने सोबत घेऊन जाण्याचा इतिहास सांगतो. तो इतिहास कुठे हरवला माहिती नाही. या होळीच्या प्रकाशात कुठेतरी तो जुना एकोप्याचा महाराष्ट्र सगळ्या नेत्यांना सापडावा आणि पुन्हा मांगल्याचे स्वर लॉबीमध्ये गुंजावेत, हीच होळीच्या निमित्ताने सदिच्छा...     - तुमचाच, बाबूराव

टॅग्स :महाराष्ट्रशरद पवारउद्धव ठाकरेएकनाथ शिंदे