Join us  

८५ जागा खात्रीच्या, भाजपने केली कॅटेगरी; विधानसभेसाठी पक्षाची रणनीती

By यदू जोशी | Published: September 17, 2024 5:42 AM

गेल्या वेळी जिंकलेल्या २५ जागांबाबत चिंता

मुंबई : आगामी विधानसभा निवडणुकीत जिंकण्याचा विश्वास असलेल्या ८५ जागा भाजपने काढल्या असून, त्यावर लक्ष केंद्रित करताना गेल्यावेळी जिंकलेल्यांपैकी २५ जागांवर यावेळी अधिक मेहनत करावी लागणार असल्याचा सूर पक्षाच्या विविध बैठकांमध्ये व्यक्त होत आहे.  विशेषत: भाजप-रा. स्व. संघ यांच्या बैठकांमध्ये या आधारे रणनीती आखली गेली आहे. या बैठकांमध्ये उपस्थित असलेल्या एका ज्येष्ठ नेत्याने ही माहिती दिली. 

विधानसभेच्या २०१९ मधील निवडणुकीत भाजपने १०५ जागा जिंकल्या होत्या. त्यावेळी भाजप-शिवसेना अशी युती होती. २०१४ च्या तुलनेत पक्षाच्या १७ जागा कमी झाल्या होत्या. सर्वाधिक फटका विदर्भात बसला होता. यावेळी भाजप-संघाच्या तसेच केवळ भाजपच्या ज्या बैठकी सुरू आहेत त्यात निवडून येण्याच्या शक्यतेच्या आधारे ए, बी आणि सी अशा तीन कॅटेगरी करण्यात आल्या आहेत. २०१४, २०१९ ची विधानसभा निवडणूक आणि २०१४ पासूनच्या तीन लोकसभा निवडणुकांत भाजपला बूथनिहाय झालेले मतदान आणि यावेळी किती मते मिळू शकतात याचा अंदाज या आधारे या कॅटेगरी निश्चित करण्यात आल्या आहेत.

गेल्यावेळच्या १०५ पैकी किमान २५ जागा अशा आहेत, की ज्या जिंकण्यासाठी अधिक लक्ष केंद्रित करावे लागेल, असे भाजप पक्षसंघटनेत वरिष्ठपदावर असलेल्यांना वाटते.  

ज्या ८५ जागांवर जिंकण्याचा विश्वास आहे, त्या सर्वच गेल्यावेळी जिंकलेल्या आहेत असे नाही. त्यातही पाच-सात जागा यावेळी धोक्यात आहेत; पण गेल्यावेळी हरलेल्या पाच-सात जागा यावेळी जिंकता येऊ शकतात, असा फीडबॅक पक्षसंघटनेत महत्त्वाच्या पदांवर असलेल्यांनी दिला.

गेल्या वेळी ज्या जागा कमी फरकाने जिंकल्या होत्या त्या जागाही भाजपने धोक्याच्या मानल्या आहेत. 

१२५ जागा जिंकण्याचे उद्दिष्ट

महायुतीमध्ये भाजप १५५ ते १६० जागा लढण्याची शक्यता आहे. त्यातील १२५ जागा जिंकण्याचे उद्दिष्ट पक्षाने ठेवले असल्याची माहिती सूत्रांनी दिली. 

ॲक्शन मोडवर भूपेंद्र यादव

भाजपचे निवडणूक प्रभारी केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव

यांनी महाराष्ट्रात विशेष जबाबदारी देण्यात आलेल्या गुजरात, मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड, तेलंगणामधील बड्या नेत्यांची चार तासांची बैठक सोमवारी घेतली. यावेळी सर्व नेत्यांना पुढील जबाबदाऱ्यांचे वाटप करण्यात आले.

महायुतीची समन्वय समिती प्रत्येक जिल्ह्यात  स्थापन करणार

महायुतीतील दोन मित्रपक्षांशी समन्वय राखण्याची जबाबदारी भाजपने ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन यांच्याकडे दिली आहे. महाजन यांनी ‘लोकमत’ला सांगितले की, विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने तिन्ही पक्षांची प्रत्येक जिल्ह्यात एक समन्वय समिती तयार केली जाईल. विधानसभा पातळीवरही समन्वयाची यंत्रणा असेल.

बैठकीला उशीर; प्रदेश पदाधिकाऱ्याला झापले

भूपेंद्र यादव यांनी अनुसूचित जाती आघाडी आणि भाजप युवा मोर्चा यांची स्वतंत्र आढावा बैठक घेतली.

भाजप युवा मोर्चाच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्याला बैठकीला उशिरा पोहोचल्याने यादव यांनी चांगलेच झापले. युवा मोर्चाचे प्रभारी प्रदेश सरचिटणीस विक्रांत पाटील यांनी सारवासारव केली.

अनुसूचित जाती आघाडीच्या बैठकीत एका आमदारालाही भूपेंद्र यादव यांनी खडे बोल सुनावल्याची माहिती आहे.

टॅग्स :भाजपानिवडणूक 2024