कामगारांच्या सुरक्षेकडे विशेष लक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2018 03:12 AM2018-04-22T03:12:04+5:302018-04-22T03:12:04+5:30
‘मेट्रो-३’चे काम : भुयारीकरणाच्या वेळी जास्त जागरूक राहण्याची प्राधिकरणाची खबरदारी
मुंबई : मुंबईत सध्या कुलाबा-वांद्रे-सीप्झ या मेट्रोे ३ मार्गाचे काम सुरू आहे. मुंबईतील पहिला भुयारी मेट्रो मार्ग अशी या प्रकल्पाची खासियत आहे. जोखमीच्या या कामामध्ये जवळपास ७६०० कामगार दिवसरात्र मेहनत करत आहेत. भुयारीकरणाच्या या कामामध्ये कामगारांच्या सुरक्षेविषयी मेट्रो प्राधिकरणाने विशेष लक्ष दिले आहे. मुंबईतील पहिल्या भुयारी मेट्रोच्या भुयारीकरण व एनएटीएम पद्धतीने बांधावयाच्या स्थानकांमध्ये टीबीएम म्हणजेच टनेल बोअरिंग मशीन्सच्या वापर होणार आहे. या प्रणालीमुळे भुयारीकरणासारख्या जोखमीच्या कामातसुद्धा या सर्व कामगारांच्या सुरक्षेविषयी जास्त जागरूक राहण्यासाठी मेट्रो प्राधिकरणाने हे पाऊल उचलले आहे.
मेट्रो-३ च्या संपूर्ण मार्गावर भुयारीकरणाचे काम सध्या सुरू आहे. यात काही महत्त्वाच्या बाबी आहेत. लाँचिंग शाफ्ट तयार करणे, टीबीएम शाफ्टमध्ये टीबीएम्स उतरवणे, तसेच भुयाराच्या अस्तरासाठी लागणाऱ्या सेगमेंटसाठी रिंग बनवणे, गास्केटच्या साहाय्याने सेगमेंट रिंगचे मजबूत आवरण भुयारात तयार करणे, टीबीएमचे एकत्रीकरण करणे, टीबीएमच्या साहाय्याने खोदकाम करणे, खोदकामातून निघणाºया मातीची विल्हेवाट मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनने ठरविलेल्या ठिकाणी लावणे अशा कठीण कामांचा समावेश असतो. त्यासाठी भौगोलिक परिस्थिती व जमिनीचा स्तर लक्षात घेऊन टीबीएम बंदिस्त व खुल्या अशा दोन्हीही पद्धतीने करण्याच्या कामांवर सध्या भर देण्यात येत आहे. तसेच ७६०० मजुरांसाठी भुयारांमध्ये विशेष सुरक्षा यंत्रणाही राबवण्यात येत आहे.
यात काही महत्त्वाच्या गोष्टींचे आॅस्ट्रेलियन प्रणालींचा अभ्यास करून पालन करण्यात आले आहे. आग व धूर सूचन यंत्रणा, अग्निशमन पडदे व पाण्याचे फवारे, पूर परिस्थितीत पाणी साठू नये म्हणून उपयोगात आणले जाणारे पंप, प्राथमिक उपचार कक्ष व आपत्कालीन परिस्थितीत उपयोगात येणाºया प्राथमिक उपचार पेट्या, कटर हेडमधील विषारी वायू निदान यंत्रणा, भुयारातील वातावरण नियंत्रित ठेवण्यासाठी चिलर प्लांट्स, प्रत्येक १५-३० मी. अंतरावर अग्निशमन यंत्रणेची व्यवस्था, विनाअडथळा संवादासाठी प्रत्येक १०० मी. वर वॉकीटॉकीची सुविधा, प्रत्येक ५० मीटरवर आपत्कालीन प्रकाश यंत्रणा, आपत्कालीन परिस्थितीत कामगारांना व अभ्यागतांना बाहेर पडण्यासाठी २७ आपत्कालीन निकास व्यवस्था तयार करण्यात आल्या आहेत. आपत्कालीन नियंत्रण कक्षाची नियमित देखरेख, सीसीटीव्ही कॅमेºयाचा वापर, भुयारीकरणादरम्यान जमा होणारी माती ज्या रेल्वे डब्यातून बाहेर नेली जाते त्यास सुरक्षेच्या दृष्टीने स्पीड मीटर, स्पीड गव्हर्नर, कॅमेरा व ट्रॅक सिग्नलिंगसारख्या यंत्रणा बसविणे, वॉटरप्रूफ, धूळ प्रतिरोधक, आग प्रतिरोधक विद्युत तारांचा वापर करण्यात येणे, अशा महत्त्वाच्या बाबींचा समावेश केला आहे.
मेट्रो प्राधिकरणाने बांधकामाच्या ठिकाणी कामगारांनी पाळावयाच्या महत्त्वाच्या सुरक्षेच्या बाबीही स्पष्ट केल्या आहेत. त्यासाठी भुयारात प्रवेश करण्याआधी काय करावे याचे एक प्रशिक्षण कामगारांना देण्यात येणार आहे. यात प्रथमोपचार, अग्निशमन, दृक्श्राव्य माध्यमाद्वारे अभ्यागतांसाठी सुरक्षाविषयक माहिती देणे, वैयक्तिक सुरक्षा उपकरणांचा वापर यावर भर देण्यात येणार आहे. भुयारीकरणाच्या वेळी कटर डिस्कचे भाग बदलावे लागतात. बंदिस्त वातावरणात ज्या वेळी टीबीएम कार्य सुरू असते त्या वेळी कामगारांना विशिष्ट दाबाची हवा असलेल्या वातावरणात काम करावे लागते. त्यास हायपरबरीक इंटरव्हेन्शन असे म्हणतात. कामगारांना खोदकाम सुरू असलेल्या भागात जाण्यासाठी जो मार्ग असतो त्यास मॅन लॉक असे म्हणतात. मॅन लॉकमध्ये दोन प्रथमोपचार पेट्या, संवाद यंत्रणा, श्वसनासाठी लागणारी हवा पुरवणारी यंत्रणा इत्यादी असते. वैद्यकीय मदत लागल्यास शाफ्टच्या वरील भागात मेडिकल लॉकची व्यवस्था या महत्त्वाच्या बाबींचा समावेशही मेट्रोे प्राधिकरणाने केला आहे.
१०० पेक्षा अनेक ठिकाणी सूचना फलक
च्मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन, सल्लागार व कंत्राटदार हे सर्व धरून ७६०० इतके मनुष्यबळ मेट्रो-३ च्या अंमलबजावणीसाठी कार्यरत आहे. कामगारांमध्ये सुरक्षेविषयी जागृती निर्माण करण्यासाठी १०० पेक्षा अधिक सुरक्षाविषयक फलक बांधकामाच्या ठिकाणी लावले गेले आहेत.
च्महत्त्वाच्या गोष्टींचे आॅस्ट्रेलियन प्रणालींचा अभ्यास करून पालन करण्यात आले आहे. आग व धूर सूचन यंत्रणा, अग्निशमन पडदे व पाण्याचे फवारे तसेच प्रत्येक ५० मीटरवर आपत्कालीन प्रकाश यंत्रणा, आपत्कालीन परिस्थितीत कामगारांना व अभ्यागतांना बाहेर पडण्यासाठी २७ आपत्कालीन निकास व्यवस्था तयार करण्यात आल्या आहेत.