मुंबई : शिवसेनेकडून मुंबई महापालिकेत गेल्या पाच वर्षांत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला आहे. त्यामुळे त्याची चौकशी करण्यासाठी स्पेशल कॅग ऑडिट करण्याची मागणी करण्यात येणार आहे, असे राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी स्पष्ट केले. यानिमित्ताने त्यांनी महापालिका निवडणुकीचे रणशिंग फुकले आहे.
भाजपचे महापालिकेतील गटनेते प्रभाकर शिंदे यांच्या पंचवार्षिक कार्य अहवालाचे प्रकाशन त्यांच्या हस्ते मुलुंड पूर्व येथील राजे संभाजी सांस्कृतिक भवन येथे झाले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी त्यांनी स्वच्छ आणि पारदर्शी सरकारसाठी महापालिकेत भाजपचे नगरसेवक बहुसंख्येने निवडून पाठवा, असे आवाहन केले.
प्रभाकर शिंदे म्हणाले की, २०१७ च्या निवडणुकीच्या प्रचारात मुलुंडचे डंपिंग ग्राउंड बंद केले जाईल, असे आश्वासन दिले होते त्याची पूर्तता केली आहे. शिवसेना पक्षाकडून जो काही भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणात होत आहे तो दूर करण्यासाठी व जनतेचा पैसा विकासासाठी वापरला जावा, यासाठी भाजपचा झेंडा महापालिकेवर फडकला पाहिजे. आ. मिहीर कोटेचा, खासदार मनोज कोटक, आ. आशिष शेलार यांनीही सेनेच्या कारभारावर टीका केली. यावेळी बिंदू तिवारी, समिता कांबळे, प्रकाश गंगाधरे या नगरसेवकांच्या कार्य अहवालाचे प्रकाशन करण्यात आले.
भावनिक मुद्दे करतील उभेनिवडणुकीच्या काळात शिवसेना भावनिक मुद्दे घेऊन महाराष्ट्राच्या अस्मितेचा मुद्दा उभा करून जनतेसमोर येईल, मते मागेल; पण त्यांच्या भ्रष्ट कारभाराची सखोल चौकशी करण्याची मागणी विधानसभेत करण्यात येईल. प्रभाकर शिंदे यांनी पाच वर्षांत शिवसेनेने केलेल्या भ्रष्टाचाराविरोधात सातत्याने आवाज उठवला आहे, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.