मुंबईत नवमतदार नोंदणीसाठी विशेष मोहीम

By सीमा महांगडे | Published: February 14, 2024 06:56 PM2024-02-14T18:56:48+5:302024-02-14T18:56:57+5:30

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नवमतदार नोंदणी प्रक्रियेला गती देण्यासाठी विशेष मोहीम राबवली जाणार आहे.

Special Campaign for New Voter Registration in Mumbai | मुंबईत नवमतदार नोंदणीसाठी विशेष मोहीम

मुंबईत नवमतदार नोंदणीसाठी विशेष मोहीम

मुंबई: आगामी लोकसभा निवडणुका जाहीर होण्याआधी मुंबई शहर आणि उपनगर या जिल्ह्यांमध्ये नवमतदार नोंदणी विशेष मोहीम राबवली जात आहे. या मोहिमेला गती देण्यासाठी मुंबई शहर व मुंबई उपनगर जिल्हा आणि मुंबई महापालिका यांच्यातर्फे संयुक्तपणे ही मोहीम राबवली जाणार आहे. नवमतदारांनी यादीमध्ये नाव नोंदवावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नवमतदार नोंदणी प्रक्रियेला गती देण्यासाठी विशेष मोहीम राबवली जाणार आहे. मुंबई महापालिकेचे आयुक्त इक्बालसिंह चहल यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई शहर जिल्हाधिकारी आणि जिल्हा निवडणूक अधिकारी संजय यादव, बेस्टचे व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल, स्वीप नोडल ऑफिसर फरोग मुकादम, विशेष कार्य अधिकारी डॅा. सुभाष दळवी, मुख्य निवडणूक कार्यालय स्वीप समन्वयक पल्लवी जाधव, महापालिकेचे सर्व संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी यांच्यासमवेत आढावा बैठक झाली. या बैठकीत १८ वर्षांवरील नवमतदार नोंदणीची विशेष मोहीम राबवणे, दिव्यांग मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी पालिकेकडे असलेल्या उपलब्ध माहितीच्या आधारे पोहचणे, अंथरुणावर खिळून असलेल्या नागरिकांची आरोग्य विभागाकडील उपलब्ध माहिती तपासून मतदार यादीतील नावांची खात्री करून घेणे, मुंबई शहर आणि उपनगर जिल्ह्यांतर्गत येणाऱ्या मुंबई विद्यापीठ, एसएनडीटी महिला विद्यापीठ, आरोग्य विद्यापीठ आणि होमी भाभा स्टेट विद्यापीठ, यांच्यासह मुंबई शहर आणि उपनगर भागातील खासगी विद्यापीठांच्या कुलगुरूंशी समन्वय साधून नवमतदारांची नोंदणी वाढविण्यासाठी विशेष नियोजन करणे आदींबाबत चर्चा करण्यात आल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

निवडणुकीच्या कामाला प्राधान्य द्या
महापालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या संलग्न आरोग्य सेविका, आशा सेविका, महिला स्वयंसहायता गट, महिला बचत गट, स्वच्छ मुंबई प्रबोधन अभियान वस्ती पातळीवरील कार्यरत संस्था व त्यांचे स्वयंसेवक तसेच नागरी सुविधा केंद्रांच्या माध्यमातून नवमतदार नोंदणी विशेष मोहिमेत सहकार्य करतील, असे आश्वासन आयुक्त डॉ. इक्बाल सिंह चहल यांनी बैठकीत दिले. संबंधितांनी निवडणुकीच्या कामाला अधिक प्राधान्य द्यावे, असे निर्देशही बैठकीत देण्यात आले.

अशी करा नोंदणी
मतदार नोंदणी करून सक्षम लोकशाहीमध्ये सहभागी होण्यासाठी आगामी लोकसभा निवडणुकीसाठी मतदार यादीमध्ये नाव नोंदवावे, तपासून घ्यावे; तसेच आपले नाव नसेल, तर मतदार नोंदणीसाठी voters.eci.gov.in / Voter Helpline Mobile App / मतदार मदत क्रमांक १८००२२१९५० यावर संपर्क करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी संजय यादव यांनी केले.

Web Title: Special Campaign for New Voter Registration in Mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.