मुंबई : इंग्रजी माध्यमाच्या शाळांकडे पालकांचा कल वाढत चालल्यामुळे राज्यात दरवर्षी अनेक मराठी माध्यमाच्या शाळा बंद पडत आहेत. मात्र असे असतानाही मुंबईतल्या सायन येथील शिव शिक्षण संस्थेचे डी. एस. विद्यालय दरवर्षी आगळावेगळा विक्रम स्वत:च्या नावावर नोंदवत आहे. इतर अनेक मराठी शाळांमध्ये नवीन शैक्षणिक वर्षासाठी जेमतेम ८० ते १०० प्रवेश झालेले असताना डी. एस. हायस्कूलमध्ये मात्र मे महिन्याच्या मध्यापर्यंत ३०० शाळाप्रवेश झालेले आहेत. जून महिन्याच्या अखेरीपर्यंत हा आकडा आणखी वाढेल, असा विश्वास संस्थाचालकांनी व्यक्त केला आहे.
मराठी माध्यमाच्या शाळांचा सातत्याने घसरत चाललेला पट (विद्यार्थी संख्या) हा चिंतेचा विषय बनला आहे. मुंबईतील बहुसंख्य मराठी माध्यमाच्या शाळांमध्ये पूर्वी जिथे दोन-तीन हजार विद्यार्थी शिकत होते, तिथे आज जेमतेम ८०० ते १२०० विद्यार्थी शिकत आहेत. काही शाळांची पटसंख्या तर ५०० पेक्षा खाली आली आहे. अशा स्थितीत डी. एस. विद्यालयाने राबविलेल्या विविध उपक्रमांमुळे या शाळेत २०१८-१९मध्ये ४८०, २०१७-१८मध्ये ४५० तर २०१६-१७मध्ये ४१५ नवीन विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला होता. २०१९-२० या नव्या शैक्षणिक वर्षासाठी मे महिन्याच्या मध्यापर्यंत शाळेत ३०० विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र प्रधान यांनी दिली.
शिक्षकांनी राबविलेल्या विविध उपक्रमांमुळे प्रवेश संख्येत वाढ झाल्याचे त्यांनी सांगितले. जानेवारी महिन्यापासूनच शाळेतील ८५ शिक्षकांनी शाळेजवळील धारावी, प्रतीक्षानगर, चुनाभट्टी परिसरातील असंख्य पालकांशी थेट संपर्क साधला. अधिकाधिक लोकांना शाळेतील नावीन्यपूर्ण उपक्रमांची माहिती देण्यासाठी कोळी महोत्सवासारख्या विविध सामाजिक-सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये शिक्षक सहभागी झाले. तिथे उपस्थित पालकांना त्यांनी शाळेतील खेळ, कला, संगीत, तंत्रज्ञान आदींशी संबंधित उपक्रमांची माहिती दिली.
शाळाप्रवेशासाठी कमी फी आकारून गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी अनुदानित शाळा टिकणे ही काळाची गरज असून यासाठी प्रवेशवाढीबाबत उपक्रम राबविण्यासाठी शाळेचे विश्वस्त, शिक्षक तसेच इतर कर्मचारी वर्गसुद्धा सक्रिय सहभागी होतो, अशी माहिती त्यांनी दिली.माध्यमिक शाळेत अधिक शाळाप्रवेश२०१९-२० या नव्या शैक्षणिक वर्षासाठी डी. एस. विद्यालयात प्रवेश घेणाऱ्यांमध्ये माध्यमिकचे अधिक विद्यार्थी आहेत. परिसरातील अनेक शाळांमध्ये केवळ इयत्ता चौथीपर्यंतचे शिक्षण देण्याची सोय असल्यामुळे आणि गेल्या काही वर्षांत शाळेतील विविध उपक्रमांमुळे शाळेचे नाव चर्चेत आल्याने नव्या शैक्षणिक वर्षात माध्यमिक वर्गात प्रवेश घेणाऱ्यांची संख्या तब्बल १८५ वर गेल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र प्रधान यांनी दिली.