Join us

डासांचे अड्डे नष्ट करण्याची पालिकेची विशेष मोहीम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2019 1:11 AM

नागरिकांनीदेखील डास प्रतिबंधाबाबत आवश्यक ती सर्व काळजी घेत पालिकेच्या कीटकनाशक विभागास साहाय्य करावे, असे आवाहन कीटकनाशक अधिकारी राजन नारिंग्रेकर यांनी केले आहे.

मुंबई : पावसाने ब्रेक घेतल्यानंतर साचलेल्या पाण्यात डासांची उत्पत्ती होत असल्याने, महापालिकेने हे अड्डे नष्ट करण्याची मोहीम हाती घेतली आहे. त्यानुसार, २० जुलैपर्यंत आठ हजार ७२९ टायर्स हटविले आहेत, तसेच दोन लाख ८४ हजार छोट्या-मोठ्या पाणी साचू शकणाऱ्या वस्तूही हटविण्यात आल्या आहेत.

बाटलीचे झाकण, टायर, थर्माकोल, नारळाच्या करवंट्या, वातानुकूलन यंत्रणा, शीतकपाटाचा डिफ्रॉस्ट ट्रे, रिकामी शहाळी, रोप कुंड्यांखालील ताटल्या यासारख्या विविध वस्तूंत साचलेल्या थोड्याशा पाण्यातही उत्पन्न होणारे डास हे डेंग्यू, हिवताप यासारख्या घातक रोगांच्या प्रसारासाठी कारणीभूत ठरतात. त्यामुळे महापालिकेने १ जानेवारी ते २० जुलै, २०१९ या सुमारे साडेसहा महिन्यांच्या कालावधीत आठ हजार ७२९ टायर्स हटविले असून, २ लाख ८४ हजार १३९ एवढ्या छोट्या-मोठ्या पाणी साचू शकणाºया इतर वस्तूही हटविल्या आहेत. नागरिकांनीदेखील डास प्रतिबंधाबाबत आवश्यक ती सर्व काळजी घेत पालिकेच्या कीटकनाशक विभागास साहाय्य करावे, असे आवाहन कीटकनाशक अधिकारी राजन नारिंग्रेकर यांनी केले आहे.

महापालिकेच्या कीटकनाशक खात्याद्वारे ‘एफ दक्षिण’ विभागात सर्वाधिक म्हणजे ८८४ टायर्स हटविण्यात आले आहेत, तर त्या खालोखाल ‘एम पूर्व’ विभागातून ५८६ व ‘के पूर्व’ विभागातून ५६९ टायर्स हटविण्यात आले आहेत, तर सर्व २४ विभागांतून ८ हजार ७२९ टायर्स हटविण्यात आले आहेत.

१ जानेवारी ते २० जुलै कालावधीत सर्वाधिक ५१,५३४ वस्तू ‘ई’ विभागातून हटविण्यात आल्या आहेत, तर त्या खालोखाल २३,९९० वस्तू ‘आर मध्य’ विभागातून, तर २२,३७८ वस्तू या ‘ए’ विभागातून हटविल्या आहेत. महापालिकेच्या सर्व २४ विभागातून २,८४,१३९ इतर वस्तू हटविल्या.

टॅग्स :मुंबई महानगरपालिका