‘राज्यातील खाद्यपदार्थ विक्रेत्यांच्या नोंदणीसाठी विशेष मोहीम राबवणार’

By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2019 05:52 AM2019-07-17T05:52:01+5:302019-07-17T05:52:06+5:30

राज्यातील प्रत्येक खाद्यपदार्थ विक्रेत्याची नोंदणी अन्न व औषध प्रशासन विभागाकडे झाली पाहिजे.

'Special campaign for registration of food adulterants in the state' | ‘राज्यातील खाद्यपदार्थ विक्रेत्यांच्या नोंदणीसाठी विशेष मोहीम राबवणार’

‘राज्यातील खाद्यपदार्थ विक्रेत्यांच्या नोंदणीसाठी विशेष मोहीम राबवणार’

Next

मुंबई : राज्यातील प्रत्येक खाद्यपदार्थ विक्रेत्याची नोंदणी अन्न व औषध प्रशासन विभागाकडे झाली पाहिजे. यासाठी विभागाने विशेष मोहीम हाती घ्यावी, असे निर्देश अन्न व औषध प्रशासन राज्यमंत्री मदन येरावार यांनी मंगळवारी प्रशासनाला दिले. येरावार यांच्या अध्यक्षतेखाली आज अन्न व औषध प्रशासन विभागाच्या कामकाजाची आढावा बैठक मंत्रालयात झाली. या वेळी अन्न व औषध प्रशासन आयुक्त पल्लवी दराडे यांच्यासह विभागाचे अतिरिक्त आयुक्त, सहआयुक्त, जिल्ह्यांचे साहाय्यक आयुक्त उपस्थित होते.
अन्नपदार्थांच्या गुणवत्तेवर लक्ष देणे गरजेचे आहे, असे सांगून येरावार म्हणाले की, यासाठी रस्त्यावर अन्नपदार्थ विकणाऱ्या छोट्या विक्रेत्यांपासून ते मोठ्या दुकानदारापर्यंत प्रत्येकाची नोंदणी अन्न व औषध प्रशासन विभागाकडे झाली पाहिजे. राज्यात मोठ्या प्रमाणात केटरिंग व्यवसाय चालक आहेत. त्यांची नोंदणी तत्काळ हाती घ्यावी. रस्त्यावरील गाड्यांवर बनविल्या जाणाºया अन्नपदार्थांची गुणवत्ता चांगली राखण्याच्या दृष्टीने तेथील विक्रेत्यांना प्रशिक्षण व अन्य सुविधा एकत्रितरीत्या पुरविण्यासाठी ‘हायजिनिक फूड हब’ ही नवीन संकल्पना राबविण्यास सुरुवात केली. मुंबईत गिरगाव चौपाटी व जुहू चौपाटी येथे असे हब स्थापन करण्यात आले असून, राज्यभरात ‘हायजिनिक फूड हब’ स्थापन करावेत.
औषध कंपन्या तसेच अन्न प्रक्रिया उद्योगांना त्यांच्या सामाजिक उत्तरदायित्व निधीतून (सीएसआर फंड) मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये मदत देण्यासाठी आवाहन करावे, अशी सूचनाही येरावार यांनी केली.
अन्न व औषध प्रशासन विभागाचे काम अधिक कार्यक्षमरीत्या होण्यासाठी एक कालबद्ध लक्ष्य निर्धारित करणे गरजेचे असून, त्यासाठी विभागाने व्हिजन डॉक्युमेंट तयार करावे. विभागाच्या सर्व जिल्हास्तरीय कार्यालयांसाठी शासकीय इमारती बांधण्याच्या कामाला गती द्यावी. सर्व इमारतींचा आदर्श आराखडा तयार करावा. विभागातील रिक्त पदे लवकर भरण्याच्या दृष्टिकोनातून पदांचा आकृतिबंध, भरतीसाठी बिंदुनामावली तयार करावी. अवैध गुटखा विक्रीला आळा घालण्यासाठी विशेष मोहीम हाती घ्यावी, आदी सूचना या वेळी करण्यात आल्या. त्यानुसार कार्यवाही केली जाणार आहे.

Web Title: 'Special campaign for registration of food adulterants in the state'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.