Join us

‘त्या’ मतदारांसाठी विशेष मोहीम

By admin | Published: October 31, 2015 12:48 AM

सेक्सवर्कर, तृतीयपंथी आणि समलिंगींनाही मतदार नोंदणी करता यावी म्हणून मुंबई जिल्हाधिकारी कार्यालयाने दोन दिवस मतदार नोंदणीचे विशेष अभियान राबविले

चेतन ननावरे, मुंबईसेक्सवर्कर, तृतीयपंथी आणि समलिंगींनाही मतदार नोंदणी करता यावी म्हणून मुंबई जिल्हाधिकारी कार्यालयाने दोन दिवस मतदार नोंदणीचे विशेष अभियान राबविले. मुंबादेवी आणि मलबार हिल या दोन ठिकाणी सामाजिक संस्थांच्या कार्यालयात झालेल्या या विशेष अभियानास मुंबईतील २०० हून अधिक वेश्याव्यवसाय करणाऱ्या स्त्रिया, तृतीयपंथी, समलिंगी व्यक्तींनी भेटी दिल्या.मुंबईतील तृतीयपंथी, समलिंगी आणि वेश्या व्यवसाय करणाऱ्या स्त्रियांची मोठ्या प्रमाणात मतदार नोंदणी करण्याचे जिल्हाधिकारी कार्यालयाने ठरवले होते. त्यानुसार मतदार नोंदणी झालेली नाही, अशा समलिंगी, तृतीयपंथी आणि वेश्या व्यवसाय करणाऱ्या स्त्रियांची मतदार नोंदणी करण्याचा निर्णय जिल्हाधिकारी कार्यालयाने घेतला. त्यासाठी वेश्या, तृतीयपंथी आणि समलिंगींसाठी काम करणाऱ्या सामाजिक संस्थांची मदतही घेण्यात आली. जिल्हाधिकारी कार्यालयाने पुढाकार घेत आशा महिला संस्था, दी ह्युमन ट्रस्ट, शेड, आशा दर्पण नागरी सेवा प्रबोधिनी अशा सामाजिक संस्थांना या मोहिमेत सामील होण्याचे आवाहन केले होते. त्यासाठी मुंबई शहराच्या उपजिल्हाधिकारी आणि उपजिल्हा निवडणूक अधिकारी अपर्णा सोमाणी-आरोलकर यांनी संस्थांना पत्रही पाठविले होते.अपर्णा सोमाणी-आरोलकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, हे अभियान केवळ वेश्याव्यवसाय करणाऱ्या स्त्रिया, तृतीयपंथी आणि समलिंगी नागरिकांसाठी आयोजित केले होते. त्यात बुधवारी २८ आॅक्टोबरला मलबार हिल मतदारसंघातील कामाठीपुरा ११ वी गल्ली येथील आशा महिला संस्थेच्या कार्यालयात पहिला कॅम्प भरला. या कॅम्पमध्ये सुमारे १५० हून अधिक वेश्याव्यवसाय करणाऱ्या स्त्रिया आणि तृतीयपंथी उपस्थित होते. महत्त्वाची बाब म्हणजे या दोन्ही घटकांसोबतच त्यांचे नातेवाईकही आले होते. तर दुसऱ्या दिवशी खेतवाडी येथील पाचव्या गल्लीतील पश्चिम खेतवाडी म्युनिसिपल स्कूलमध्ये कॅम्पचे आयोजन केले होते. यावेळी शंभरहून अधिक स्त्रिया, समलिंगी आणि तृतीयपंथींनी उपस्थिती दर्शवली.मुंबादेवी मतदारसंघात अवघ्या चार तासांच्या कॅम्पमध्ये ४९ स्त्रिया आणि १७ पुरुषांनी नोंदणीसाठी अर्ज केले. तर ५०हून अधिक तृतीयपंथी व समलिंगी नागरिकांनी चौकशी करत अर्ज घेऊन गेले. याउलट मलबार हिलमध्ये २४ स्त्रिया आणि ८ पुरुषांनी मतदार नोंदणीसाठी अर्ज केले. तर एका समलिंगी व्यक्तीने नावात बदल करण्यासाठी अर्ज केला. दरम्यान भायखळा मतदारसंघातील दोन समलिंगी व्यक्तींनी नावनोंदणीसाठी अर्ज केल्याचे कळाले.मुंबई शहर जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे ८ आॅक्टोबरपासून ७ नोव्हेंबरपर्यंत विशेष मतदार नोंदणी अभियान सुरू केले आहे. त्याअंतर्गत ३१ डिसेंबर २०१५ पर्यंत ज्यांची वयाची १८ वर्षे पूर्ण होणार आहेत, त्या सर्वांना मतदार नोंदणी करता येणार आहे. शिवाय ज्या मतदारांना नावात, पत्त्यात किंवा नोंदणीत कोणताही बदल करावयाचा असेल, त्यांनाही अर्ज करता येणार आहे. मुंबई शहरातील १० विधानसभा मतदारसंघांतून ८ आॅक्टोबरपासून आतापर्यंत नाव कमी करणे, नावात बदल, नवीन नोंदणी अशा विविध बाबींसाठी एकूण १५ हजार ९२८ मतदारांनी अर्ज केले आहेत.कुठे कराल अर्ज?नवीन मतदार नावनोंदणीसाठी, नाव कमी करण्यासाठी, पत्त्यात किंवा नावात बदल करण्यासाठी सर्व नागरिकांच्या मदतीला विधानसभानिहाय सेंटरची उभारणी करण्यात आली आहे. शहरातील १० विधानसभा मतदारसंघांत एकूण २६० सेंटरची उभारणी केल्याचे जिल्हाधिकारी कार्यालयाने सांगितले. याशिवाय े४ेुं्रू्र३८.ॅङ्म५.्रल्ल या संकेतस्थळावरही सर्व नागरिकांना मतदार नोंदणी करता येईल.