मुंबई : देशभरात कोरोनाचा प्रादुर्भाव वेगाने वाढत असल्यामुळे चित्रपट आणि मालिकांच्या चित्रीकरणस्थळी विशेष खबरदारी घेण्यात येत असल्याची माहिती इंडियन फिल्म्स ॲण्ड टीव्ही प्रोड्युसर काउन्सिलने (आयएफटीपीसी) दिली.
सध्या चित्रीकरण सुरू असलेल्या ९० मालिकांच्या सेटवरील प्रत्येक कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी घेण्याचे आवाहन करण्यात आले होते. त्यानुसार गेल्या काही दिवसांत जवळपास नऊ हजार जणांच्या चाचण्या करण्यात आल्या. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी राज्य सरकारने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार दर १५ दिवसांनी सेटवरील प्रत्येक व्यक्तीची चाचणी करण्यात येईल. शिवाय विशेष खबरदारी म्हणून दर आठवड्याला प्रत्येकाची अँटिजेन चाचणी करण्याच्या सूचना निर्मात्यांना दिल्याचे आयएफटीपीसीकडून सांगण्यात आले.
आयएफटीपीसीच्या चित्रपट आणि वेब विभागाचे अध्यक्ष जे. डी. मजेठिया यांनी सांगितले की, या चाचण्यांचा खर्च संबंधित ब्रॉडकास्टरने करायचा आहे. चित्रीकरण स्थळांवर कोरोना प्रतिबंधक नियमांचे काटेकोरपणे पालन केले जात आहे. शिवाय सेटवर बायोबबल सुविधा उभारण्याच्या सूचना निर्मात्यांना केल्या आहेत. त्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. चित्रीकरण स्थळांवर घेण्यात येणाऱ्या या विशेष सुविधा लक्षात घेऊन राज्य शासन मनोरंजन क्षेत्रावर निर्बंध लावणार नाही, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
राज्यावर सध्या लॉकडाऊनचे वारे घोंगावत आहेत. अशावेळी लोकांनी जास्तीत जास्त वेळ घरात थांबायचे झाल्यास त्यांच्या मनोरंजनात खंड पडू नये याची काळजी घेण्याची गरज आहे. त्यामुळे मनोरंजन क्षेत्राचा अत्यावश्यक सेवेत समावेश करावा तसेच या क्षेत्रात काम करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला अत्यावश्यक सेवेकऱ्यांप्रमाणे निर्बंधांतून सूट द्यावी, अशी मागणी मजेठिया यांनी केली.
.........................