Join us

नॅशनल पार्कमध्ये मोरांची घेतली जाते विशेष काळजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2021 4:08 AM

शीघ्र कृती दलही मदतीला : बर्ड फ्ल्यूच्या पार्श्वभूमीवर खबदारीलोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : बर्ड फ्ल्यूच्या पार्श्वभूमीवर बोरीवली येथील ...

शीघ्र कृती दलही मदतीला : बर्ड फ्ल्यूच्या पार्श्वभूमीवर खबदारी

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : बर्ड फ्ल्यूच्या पार्श्वभूमीवर बोरीवली येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात असलेल्या पाच मोरांबाबत उद्यान प्रशासन अधिक सजग झाले आहे. माेरांची विशेष काळजी घेण्यात येत असल्याची माहिती प्रशासनाने दिली.

संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचे वन अधिकारी विजय बारब्दे यांनी सांगितले की, मुंबई महापालिकेने बर्ड फ्ल्यूबाबत ज्या सूचना केल्या आहेत त्याची अंमलबजावणी करण्यात येत आहे. शिवाय केंद्रीय प्राणी संग्रहालय प्राधिकरणानेही सूचना केल्या होत्या. त्यानुसार येथे काम सुरू आहे. सध्या उद्यानात पाच मोर आहेत. येथे जंतूनाशकाचा वापर केला जात आहे. शिवाय कर्मचाऱ्यांसह सर्वांनाच स्वच्छता राखण्याचे आवाहन केले जात आहे.

अद्याप येथे बर्ड फ्ल्यूचा प्रकार निदर्शनास आलेला नाही. जंगलात असे पक्षी किंवा एखादा स्थलांतरित पक्षी जरी निर्दशनास आला तरी आम्ही सज्ज आहाेत. सर्व यंत्रणा सज्ज असून, एक शीघ्र कृती दलही स्थापन करण्यात आले आहे. एखादे प्रकरण नोंदविण्यात आले तर तो पक्षी आपण त्यांच्या ताब्यात देऊ. पुढील कार्यवाही करण्यासाठी ते त्याला पुण्याला पाठवून देतील, असे बारब्दे यांनी स्पष्ट केले.

........................................