महिला, बालकांच्या अनैतिक व्यापाराला प्रतिबंधासाठी विशेष कक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 8, 2020 04:06 AM2020-12-08T04:06:54+5:302020-12-08T04:06:54+5:30
* गृह विभागाचा हिरवा कंदील : आणखी २४ जिल्ह्यांत होणार स्थापना जमीर काझी लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : महिला ...
* गृह विभागाचा हिरवा कंदील : आणखी २४ जिल्ह्यांत होणार स्थापना
जमीर काझी
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : महिला व बालकांच्या अनैतिक वाहतुकीला लगाम घालण्यासाठी कार्यरत असलेल्या विशेष पथकामध्ये आता आणखी २४ कक्षांची भर पडणार आहे. राज्यातील विविध २४ जिल्ह्यांत हे विभाग स्थापले जाणार आहेत. त्यामुळे राज्यातील सर्व ३६ जिल्ह्यांत आता हे कक्ष कार्यरत असणार आहेत.
गृह विभागाने या कक्षाच्या निर्मितीच्या प्रस्तावाला हिरवा कंदील दाखविला आहे. त्यासाठी विशेष २७५ पदांना मंजुरी दिली असल्याचे विश्वसनीय सूत्रांकडून सांगण्यात आले. ‘ह्युमन ट्रॅफिकिंग’च्या विरोधात १२ घटकांमध्ये विशेष कक्ष कार्यरत आहे. त्यामध्ये मुंबई, नवी मुंबई, ठाणे, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, बीड, अहमदनगर आदींचा समावेश आहे.
वेश्याव्यवसायासाठी महिला, तरुणींना ताब्यात घेणे; तसेच खंडणी व भीक मागण्यासाठी लहान मुलांचे अपहरण करणाऱ्या टोळ्या कार्यरत आहेत. त्याला आळा घालण्यासाठी अन्य गंभीर गुन्ह्यांच्या शोधासाठी ज्याप्रमाणे स्वतंत्र पथक कार्यरत असते तसेच अनैतिक मानवी वाहतूक रोखण्यासाठी टप्प्याटप्प्याने १२ जिल्ह्यांत विशेष कक्ष कार्यरत करण्यात आले. त्या ठिकाणी अशा घटनांना बऱ्यापैकी अंकुश बसत आहे. त्याप्रमाणेच उर्वरित २४ घटकांमध्ये ही पथके स्थापन करण्याबाबतचा प्रस्ताव पोलीस महासंचालकांनी गृह विभागाकडे मंजुरीला पाठविला होता. त्याला नुकतीच मान्यता देण्यात आली आहे. त्यासाठी एकूण नव्याने २७६ पदांना मंजुरी देण्यात आली आहे.
या घटकांत होणार विशेष कक्ष
औरंगाबाद शहर, हिंगोली, गडचिरोली, चंद्रपूर, गोंदिया, नाशिक, पुणे, सातारा, वर्धा, अकोला, वाशिम, अमरावती, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, जालना, लातूर, नांदेड, परभणी, जळगाव, उस्मानाबाद, बुलडाणा, नंदुरबार व पालघर.