लॉकडाउनमध्ये विशेष मुलांचेही समुपदेशन
By ऑनलाइन लोकमत | Published: April 28, 2020 01:15 AM2020-04-28T01:15:37+5:302020-04-28T01:15:50+5:30
सरकारच्या सर्वसमावेशित शिक्षण विभागातील शिक्षकांचाही या विद्यार्थ्यांच्या समुपदेशनाला हातभार लागत आहे.
सीमा महांगडे
मुंबई : लॉकडाउनच्या काळात विशेष मुलांच्या समस्या वाढल्या आहेत. सक्तीने घरात बसून स्वमग्न, विशेष मुले आणि त्यांच्यामुळे सोबत त्यांच्या पालकांची चिडचिड झाली आहे. या काळात एक ना अनेक कारणाने त्यांना नव्या मानसिक तणावांना-आव्हानांना सामोरे जावे लागत आहे. मात्र काही शाळांतून आणि मानसोपचारतज्ज्ञांकडून केले जाणारे वैयक्तिक समुपदेशन या पालक-विद्यार्थ्यांना मोठा आधार देत आहे. त्याचप्रमाणे सरकारच्या सर्वसमावेशित शिक्षण विभागातील शिक्षकांचाही या विद्यार्थ्यांच्या समुपदेशनाला हातभार लागत आहे.
विशेष मुलांमध्ये हायपर अॅक्टिव्ह, आॅटिस्टिक, सेरेब्रल पाल्सी आणि बौद्धिक अक्षमता असणारी अशी विविध प्रकारची मुले आहेत. अशा मुलांना या लॉकडाउन काळात वारंवार जे बिहेव्हिअर इश्यूज दिसतात त्यामागे खरे तर अनोळखी, आपल्याला माहीत नसलेल्या संवेदना किंवा शारीरिक गरजा असू शकतात, ज्यांची पूर्तता न झाल्यामुळे मूल वारंवार काही हालचाली किंवा वागणुकीद्वारे ती गरज पूर्ण करण्याचा प्रयत्न करत असतात. त्यामुळे या काळात पालकांच्या तक्रारींचे, अडचणींचे फोन वाढले असल्याची माहिती समावेशित शिक्षणाच्या मुंबई जिल्हा समन्वयिका शिल्पा गावडे यांनी दिली. मात्र सध्या त्यांचे थेट शिक्षण सुरू नसले तरी शिक्षक, पालकांच्या व्हॉट्सअॅप ग्रुप्समधून विविध प्रकारचे समुपदेशन, व्हिडीओ यांमधून या विद्यार्थ्यांच्या समस्या सोडवीत असल्याची माहिती त्यांनी दिली.
सोशल मीडियावरील मोटिव्हेशनल लेख, यूट्युबवरील मार्गदर्शक व्हिडीओ याद्वारे शिक्षक पालकांना मुलांना कसे योग्य प्रकारे संभाळून, अभ्यास घेऊ शकतात, नवीन गोष्टी शकवू शकतात याचे मार्गदर्शन करत असल्याची माहिती त्यांनी दिली. अध्ययन अक्षम असणाऱ्या मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात सक्षमपणे टिकवून ठेवण्यासाठी, त्यांची शीघ्र ओळख करून योग्य हस्तक्षेपाद्वारे अंमलात आणावयाच्या उपचारात्मक शिक्षण पद्धती, आधुनिक अध्यापन तंत्रे यासंदर्भात मार्गदर्शन केले जात आहे. अध्ययन-अध्यापन तंत्रे वर्गात शिक्षकांनी वापरावीत, यासंदर्भात शिक्षकांनाही मार्गदर्शन केले जाणार आहे.
कांगारू किड्स प्रीस्कूल अॅण्ड बीलाबाँग इंटरनॅशनल हाय या शाळेत तर सामान्य मुलाप्रमाणेच या मुलांचेही व्हर्च्युअल आॅनलाइन क्लासेस घेतले जात आहेत. यामध्ये शिक्षकांऐवजी शॅडो टीचर म्हणून पालक जबाबदारी पार पाडत असून, शिक्षकांकडून आॅनलाइन मार्गदर्शन केले जात आहे. पुणे, बडोदा, मुंबई येथे ९ समुपदेशक आणि ८ विशेष शिक्षक यांचे आॅनलाइन क्लासेस या मुलांसाठी १ एप्रिलपासून सुरू करण्यात आल्याची माहिती या शाळेचे क्वालिटी अॅशुरन्स अॅण्ड स्पेशल नीड्सचे प्रमुख साचू रामलिंगम यांनी दिली. सद्यस्थितीत ते ११०हून अधिक विशेष विद्यार्थ्यांना आॅनलाइन लर्निंगद्वारे समुपदेशन करत असून या कठीण काळात या मुलांची विशेष काळजी घेणे आवश्यक असल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले. त्यामुळे त्यांच्याही शिक्षणात खंड पडू नये, हा उद्देश असल्याचे त्यांनी संगितले. सामान्य मुलांपेक्षाही विशेष मुलांसाठी हा काळ कठीण आहेच, मात्र त्यांच्या पालकांसाठी तो अधिक कठीण आहे. त्यांच्या शिक्षणासाठीही आॅनलाइन लर्निंगमुळे शिक्षणाचे दरवाजे उघडण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे या प्रयत्नातून दिसत आहे.