मुंबई : गेल्या काही वर्षांत औद्योगिक क्षेत्रात दुर्घटनांचे प्रमाण वाढले आहे. कोरोना काळात उद्योग क्षेत्राची गती मंदावलेली असतानाही तब्बल ११६ दुर्घटनांची नोंद झाली. त्यामुळे कामगारांच्या सुरक्षेसाठी विशेष आयोगाची स्थापना करावी, असे मत इंटक, महाराष्ट्र हिंद मजदूर सभेसह विविध कामगार संघटनांनी व्यक्त केले आहे.
देशभरातील कामगारांच्या प्रश्नांवर भाष्य करण्यासाठी विविध कामगार संघटनांच्या प्रतिनिधींनी गुरुवारी ऑनलाइन पत्रकार परिषदेचे आयोजन केले. यावेळी बोलताना 'इंडस्ट्री ऑल' या आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेचे सहायक सरचिटणीस केमाल ओजकान म्हणाले की, कामगारांचे आरोग्य आणि सुरक्षेबाबत भारत सरकारने विशेष लक्ष देण्याची गरज आहे. देशात मे २०२० ते जून २०२१ या काळात रासायनिक व खाण उद्योगात ११६ दुर्घटनांची नोंद झाली असून, त्यात २३१ कामगार दगावले.
चालू वर्षाचा विचार करता जानेवारी ते जूनदरम्यान रासायनिक आणि खाण उद्योगात ५२ दुर्घटना घडल्या. त्यामध्ये ११७ कामगार मृत्यू पावले, १४२ पेक्षा जास्त जण गंभीर जखमी झाले. दुसरीकडे कोरोनामुळे १ हजार ८५७ कामगारांचा मृत्यू झाला आहे. कंत्राटदार अकुशल कामगारांची भरती करतात, त्यांना कोणत्याही प्रकारचे प्रशिक्षण देत नाहीत. कामाच्या ठिकाणी सुरक्षा साधनांचा वापर केला नाही. कामगारांना सुरक्षात्मक माहिती दिली जात नाही. त्यामुळे अपघातांचे प्रमाण वाढल्याचे निरीक्षण त्यांनी नोंदविले.
इंटकचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. संजीव रेड्डी यांनी सांगितले की, औद्योगिक दुर्घटनाचे निराकारण करण्यासाठी केंद्र सरकारने एका विशेष आयोगाची स्थापना करावी. त्याशिवाय कामगारांच्या सुरक्षेसाठी नियम सशक्त करून, कामगार संघटनांना विश्वासात घेऊन काम केले पाहिजे.
दुर्घटनांची सखोल चौकशी व्हावी
औद्योगिक क्षेत्रात दुर्घटनांचे प्रमाण वाढले असले तरी त्याची चौकशी होत नसल्याने दोषींचे फावले आहे. त्यामुळे सुरक्षात्मक उपाययोजना करण्याकडे पुरेसे लक्ष दिले जात नाही, हा चिंतेचा विषय आहे. केंद्र व राज्य सरकारने त्वरित सुरक्षा निरीक्षण नियमावली कठोर करून उच्चस्तरीय चौकशी केली पाहिजे, अशी मागणी इंडस्ट्री ऑलचे कार्यकारी सदस्य व महाराष्ट्र हिंद मजदूर सभेचे जनरल सेक्रेटरी संजय वढावकर यांनी केली.