मुख्यमंत्री वैद्यकीय साहाय्यता कक्षासाठी विशेष समिती, सात सदस्यांची नियुक्ती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2017 03:28 AM2017-09-10T03:28:44+5:302017-09-10T03:29:29+5:30
मुख्यमंत्री वैद्यकीय साहाय्यता कक्षामार्फत हृदयशस्त्रक्रिया, किडनी, मूत्रपिंडरोपण, कर्करोग इ. गंभीर स्वरूपाच्या आजारांनी त्रस्त रुग्णांना शस्त्रक्रियेसाठी अर्थसाह्य करण्यात येते.
मुंबई : मुख्यमंत्री वैद्यकीय साहाय्यता कक्षामार्फत हृदयशस्त्रक्रिया, किडनी, मूत्रपिंडरोपण, कर्करोग इ. गंभीर स्वरूपाच्या आजारांनी त्रस्त रुग्णांना शस्त्रक्रियेसाठी अर्थसाह्य करण्यात येते. याशिवाय, सार्वजनिक विश्वस्त संस्था अधिनियमांतर्गत नोंदणी केलेल्या रुग्णालयामार्फत गरीब व गरजू रुग्णांवर स्वस्त दरात उपचार केले जातात. याचे पुढचे पाऊल म्हणून आता रुग्णांना मदत करण्यासाठी मुख्यमंत्री वैद्यकीय साहाय्यता कक्षांतर्गत विशेष समितीची नियुक्ती करण्यात आली आहे.
मुख्यमंत्री वैद्यकीय साहाय्यता कक्षाचे बळकटीकरण करण्यासाठी ही समिती रुग्णांच्या अर्जांची छाननी व तपासणी करणार आहे. या समितीच्या अध्यक्षपदी सार्वजनिक आरोग्य विभागाचे प्रधानसचिव असतील. तर वैद्यकीय शिक्षण संचालक यांच्यावर समितीच्या सह-अध्यक्षपदाची जबाबदारी राहणार आहे. या समितीत एकूण सात सदस्य असणार आहेत. याविषयी नुकताच सार्वजनिक आरोग्य विभागाने शासननिर्णय जाहीर केला आहे.
या समितीद्वारे रुग्णांच्या अर्जांची छाननी करण्यासाठी व आवश्यकता असल्यास स्पष्टीकरण देण्यासाठी साहाय्य करेल. यासाठी वैद्यकीय शिक्षण विभागांतर्गत असलेल्या वैद्यकीय अधिकाºयांचे एक पथक त्या विभागाकडून तयार करण्यात यावे. हे पथक शिफारस करेल त्याच रुग्णांना योग्य निकषांच्या आधारे अर्थसाह्य देण्यात येईल. त्याचप्रमाणे, डॉक्टर, रुग्णालयांना अर्ज भरण्यासाठी साहाय्य करणे, अन्य धर्मादाय संस्थांकडून अर्थसाह्य मिळवण्यासाठी रुग्णांना मार्गदर्शन करणे, वैद्यकीय उपचार करणाºया अन्य संस्थांशी संपर्क करणे व अतिरिक्त निधी मिळवण्यासाठी सुनिश्चिती करणे अशा प्रकारचे कार्य समितीद्वारे करण्यात येईल.