लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई- लहान मुलांसाठी कालिना येथे स्वतंत्र काळजी केंद्र सुरू केल्यानंतर आता विक्रोळी पश्चिम येथे तृतीयपंथी, समलैंगिक नागरिकांसाठी विशेष लसीकरण केंद्र सुरु करण्यात आले आहे. मंगळवारी पहिल्याच दिवशी दुपारी अडीच वाजेपर्यंत येथे सुमारे शंभर तृतीयपंथी नागरिकांचे लसीकरण करण्यात आले.
महापालिकेमार्फत विक्रोळी (पश्चिम) येथे सेंट जोसेफ शाळेमध्ये हे विशेष लसीकरण केंद्र सुरु करण्यात आले आहे. या केंद्राचे लोकार्पण सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्या हस्ते मंगळवारी करण्यात आले. हे केंद्र संपूर्णपणे एन विभागाच्या आरोग्य विभागाकडून चालविण्यात येणार आहे. त्यासाठी समलैंगिक समुदायाच्या हितासाठी कार्यरत बिगर शासकीय संस्थांचेही सहकार्य घेण्यात आले आहे.
हे केंद्र पुढील सहा महिने संचालित करण्यात येणार आहे. तृतीयपंथ नागरिकांकडे कोणतेही ओळखपत्र नसले तरीही त्यांचे लसीकरण पूर्ण करण्यात येणार आहे. तृतीयपंथी व समलैंगिक संबंधित क्षेत्रात कार्यरत बिगर शासकीय संस्थांनी त्यांना लस घेण्यासाठी प्रोत्साहित करावे, असे आवाहन पालिका प्रशासनाने केले आहे.
आरोग्य मंत्र्यांकडून पालिकेचे कौतुक....
मुंबईची भौगोलिक परिस्थिती आणि लोकसंख्या पाहता, कोरोनासारख्या आजाराचा संसर्ग रोखणे तसेच त्यावर नियंत्रण मिळविणे ही अत्यंत आव्हानात्मक कामगिरी होती. असे असले तरी महापालिकेने हे शिवधनुष्य यशस्वीपणे पेलले. याचे श्रेय महापालिकेच्या यंत्रणेला, उत्तम प्रशासकीय धोरणांना आणि नियोजनबद्ध कामकाजाला जाते, असे कौतुक राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री राजेश टोपे यांनी यावेळी केले.
येथे संपर्क साधा...
एन विभाग वॉर्ड वॉर रुम संपर्क क्रमांक ०२२ – २१०१०२०१ यावर संपर्क साधावा.