इंद्राणी मुखर्जीचा जामीन अर्ज विशेष न्यायालयाने फेटाळला
By ऑनलाइन लोकमत | Published: September 7, 2018 11:35 PM2018-09-07T23:35:48+5:302018-09-07T23:36:07+5:30
शीना बोरा हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी इंद्राणी मुखर्जी हिचा जामीन अर्ज विशेष सीबीआय न्यायालयाने शुक्रवारी फेटाळला. खालावलेल्या प्रकृतीचे व कारागृहात जिवाला धोका असल्याचे कारण देत इंद्राणीने जून महिन्यात जामिनासाठी विशेष न्यायालयात अर्ज केला होता.
मुंबई : शीना बोरा हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी इंद्राणी मुखर्जी हिचा जामीन अर्ज विशेष सीबीआय न्यायालयाने शुक्रवारी फेटाळला.
खालावलेल्या प्रकृतीचे व कारागृहात जिवाला धोका असल्याचे कारण देत इंद्राणीने जून महिन्यात जामिनासाठी विशेष न्यायालयात अर्ज केला होता. न्यायालयाने तो फेटाळताना म्हटले की, बाहेरपेक्षा इंद्राणी कारागृहात अधिक सुरक्षित आहे. तब्येत ठीक नसल्याचे कारण अतिशयोक्ती आहे. तिला अतिशय सुरक्षित सेलमध्ये ठेवले आहे, असे सीबीआयने जामीन अर्जाला विरोध करताना म्हटले. तिची जामिनावर सुटका केली तर तपासयंत्रणेच्या खटल्याला हानी पोहोचेल.
इंद्राणीने अर्जात एप्रिलमध्ये रुग्णालयात दाखल केल्याचे म्हटले आहे. डॉक्टरांच्या औषधांच्या चिठ्ठीशी कोणीतरी छेडछाड केल्याने औषध बदलल्याचा तिचा दावा आहे. तर सीबीआयने तिने औषधांचा ओव्हरडोस घेतल्याचे म्हटले.
सुनावणीनंतर इंद्राणी सह आरोपींशी बोलते; त्यातील कदाचित एकाने तिला औषध दिले असेल. त्यामुळे तब्येत ढासळली असावी, असा युक्तिवाद सीबीआयने केला.