लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : खटल्यादरम्यान तुरुंगात काढलेल्या दिवसांची मोजदादही जन्मठेपेच्या शिक्षेत करावी, असा अर्ज १९९३च्या साखळी बॉम्बस्फोटांतील दोषी अबू सालेमने विशेष न्यायालयात केला. न्यायालयाने तो मंजूर केला आहे. २००५ मध्ये सालेमला पोर्तुगालवरून भारतात आणण्यात आले. बॉम्बस्फोटांत त्याला २०१७ मध्ये दोषी ठरवण्यात आले आणि जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात आली. तो सध्या तळोजा कारागृहात शिक्षा भोगत आहे. अटक केलेल्या दिवसापासून म्हणजेच ११ नोव्हेंबर २००५ पासून खटल्याचा अंतिम निकाल येईपर्यंत म्हणजेच ७ सप्टेंबर २०१७ पर्यंत तुरुंगातील दिवस जन्मठेपेच्या शिक्षेत धरावेत, असा अर्ज अबू सालेम याने विशेष टाडा न्यायालयात केला होता.
साखळी बॉम्बस्फोटां शिवाय सालेम याला बिल्डर प्रदीप जैन हत्येप्रकरणी २०१५ मध्ये जन्मठेप सुनावली. तुरुंग प्रशासनाने प्रदीप जैन हत्येप्रकरणी अंडर ट्रायल म्हणून असलेले दिवस धरले. पण ती सूट साखळी बॉम्बस्फोटात देण्यास तुरुंग प्रशासन तयार नाही, असे सालेमने अर्जात म्हटले होते. दोन्ही प्रकरणांतील शिक्षा एकत्रित सुरू राहील, असे न्यायालयाने आदेशात स्पष्ट म्हटले असतानाही, तुरुंग प्रशासन आठमुठेपणा करत असल्याचे सालेमने अर्जात म्हटले होते.