मुंबई : काेराेना संसर्ग नियंत्रणात येत असून आता मध्य रेल्वेने मुंबई-पुणे विशेष डेक्कन एक्स्प्रेसच्या सेवा व्हिस्टाडोम कोचसह शनिवार, २६ जूनपासून पूर्ववत करण्याचा निर्णय घेतला आहे. या मार्गावर प्रथमच ही ट्रेन व्हिस्टाडोम कोचसह धावेल. त्यामुळे प्रवाशांना पश्चिम घाटावरील नदी, खोरे, धबधबे दृश्यांचा आनंद घेता येईल.
सध्या व्हिस्टाडोम कोच मुंबई-मडगाव जनशताब्दी विशेष ट्रेनमध्ये जोडलेला आहे. आता मुंबई-पुणे मार्गावरील प्रवासी येथून जाताना माथेरान टेकडी (नेरळ जवळील), सोनगीर टेकडी (पळसदरी जवळील), उल्हास नदी (जांबरूंग जवळील), उल्हास व्हॅली, खंडाळा आदींसह लोणावळा, दक्षिण पूर्व घाटातील बोगदे, धबधबे या निसर्गरम्य सौंदर्याचा आनंद घेऊ शकतात. मुंबई ते पुणे भाडे ८५५ रुपये, तर मुंबई ते लाेणावळा ६५५ रुपये आहे. विस्टाडाेम कोचच्या विशेष वैशिष्ट्यांमध्ये वाइड विंडो पॅन, काचेचे छप्पर, फिरण्यायोग्य खुर्ची इत्यादींचा समावेश आहे.
या वेळेत धावणार
विशेष डेक्कन एक्स्प्रेस २६ जूनपासून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून दररोज ७ वाजता सुटेल आणि त्याच दिवशी ११.०५ वाजता पुण्याला पोहोचेल. डेक्कन एक्स्प्रेस विशेष २६ जूनपासून दररोज १५.१५ वाजता पुण्याहून सुटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे त्याच दिवशी १९.०५ वाजता पोहोचेल. तिला दादर, ठाणे, कल्याण, नेरळ, लोणावळा, तळेगाव, खडकी आणि शिवाजी नगर येथे थांबे असतील. केवळ आरक्षित तिकीट असलेल्या प्रवाशांनाच या विशेष गाड्यांमध्ये चढण्याची परवानगी आहे. प्रवाशांना प्रवासादरम्यान कोरोनाशी संबंधित सर्व निकषांचे पालन करावे लागेल.