चेंगराचेंगरी टाळण्यासाठी विशेष सुरक्षा, एलफिन्स्टनची पुनरावृत्ती नको

By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2019 03:09 AM2019-05-11T03:09:41+5:302019-05-11T03:12:07+5:30

एलफिन्स्टन रोड रेल्वे स्थानकाच्या (प्रभादेवी) जिन्यावर झालेल्या चेंगराचेंगरीत तब्बल २३ निष्पाप जीवांचे बळी गेले. या घटनेची पुनरावृत्ती होऊ नये, यासाठी रेल्वे प्रशासनाने कंबर कसून सुरक्षा व्यवस्थेत वाढ केली आहे.

Special defenses to avoid staging of the stampede, do not repeat Alfonston's repetition | चेंगराचेंगरी टाळण्यासाठी विशेष सुरक्षा, एलफिन्स्टनची पुनरावृत्ती नको

चेंगराचेंगरी टाळण्यासाठी विशेष सुरक्षा, एलफिन्स्टनची पुनरावृत्ती नको

Next

मुंबई : एलफिन्स्टन रोड रेल्वे स्थानकाच्या (प्रभादेवी) जिन्यावर झालेल्या चेंगराचेंगरीत तब्बल २३ निष्पाप जीवांचे बळी गेले. या घटनेची पुनरावृत्ती होऊ नये, यासाठी रेल्वे प्रशासनाने कंबर कसून सुरक्षा व्यवस्थेत वाढ केली आहे.

मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गावरील एकूण २३ स्थानकांवर गर्दीचे प्रमाण सर्वाधिक असते. यामधील मध्य रेल्वेची १३ आणि पश्चिम रेल्वेची १० स्थानके समाविष्ट आहेत. त्यामुळे या स्थानकांवरील गर्दीचे विभाजन करण्यासाठी रेल्वे प्रशासनाची तयारी सुरू आहे. पश्चिम रेल्वे मार्गावरील १० स्थानकांवरील ३४ पादचारी पुलांवर सर्वाधिक गर्दी असते. ही गर्दी हटविण्यासाठी रेल्वे सुरक्षा बल आणि महाराष्ट्र सुरक्षा बल यांना तैनात करण्यात येणार आहे.

मध्य रेल्वे मार्गावरील गर्दीच्या स्थानकांवर तब्बल ८०१ जवानांना उभे केले जाणार आहे. यामधील महाराष्ट्र सुरक्षा बलाचे २५१ आणि रेल्वे सुरक्षा बलाचे ५५० जवान आणि अधिकारी असणार आहेत. पश्चिम रेल्वे मार्गावरील गर्दीच्या स्थानकांवर ७०० जवानांना तैनात केले जाणार आहे. यामधील महाराष्ट्र सुरक्षा बलाचे २०० आणि रेल्वे सुरक्षा बलाचे ५०० जवान आणि अधिकारी असणार आहेत.
पावसाचे पाणी भरल्याने गर्दीचे प्रमाण एका ठिकाणी वाढते. त्यामुळे एका ठिकाणी जास्त गर्दी झाल्यास उद्घोषणेद्वारे गर्दी कमी करण्याची घोषणा केली जाणार आहे. यासह सीसीटीव्हीद्वारे गर्दीच्या ठिकाणांवर लक्ष ठेवले जाणार आहे. ज्या ठिकाणी गर्दी जास्त दिसेल त्या ठिकाणी तत्काळ जवानांना पाठवून गर्दी हटविण्यात येईल.

पश्चिम रेल्वे मार्गावरील दादर, वांद्रे, सांताक्रुझ, अंधेरी, जोगेश्वरी, मालाड, बोरीवली, भार्इंदर, वसई रोड, विरार आणि मध्य रेल्वे मार्गावरील मशीद, चिंचपोकळी, करी रोड, परळ, दादर, कुर्ला, घाटकोपर, ठाणे, डोंबिवली, कल्याण, टिटवाला, अंबरनाथ आणि बदलापूर या स्थानकांवर रेल्वे सुरक्षा बल आणि महाराष्ट्र सुरक्षा बलाचा फौजफाटा वाढविण्यात येणार आहे.

गर्दीच्या स्थानकांची यादी तयार करून त्या स्थानकांवर जवानांना नेमण्यात येणार आहे. पावसाळ्यात गर्दीचे व्यवस्थापन करण्याचे काम जवानांकडून केले जाणार आहे. यासाठी रेल्वे सुरक्षा बल आणि महाराष्ट्र सुरक्षा बल यांना प्रशिक्षण दिले आहे. आपत्कालीन घटना रोखण्यासाठी जवानांना प्रशिक्षण देण्याचे काम सुरू आहे.
- एस. आर. गांधी,
विभागीय वरिष्ठ सुरक्षा आयुक्त, पश्चिम रेल्वे

निवडणुकीच्या काळात राज्यभरात ड्युटीसाठी गेलेले रेल्वे सुरक्षा बलाचे जवान आणि अधिकारी पुन्हा मुंबई विभागात येणार आहेत. या जवानांना प्रशिक्षण देऊन पावसाळ्यात गर्दीच्या स्थानकांवर तैनात करण्यात येणार आहे. शुक्रवारी दादर स्थानकात मॉक ड्रिल घेण्यात आली होती. त्यामुळे आपत्कालीन घटनेचा सामना करून प्रवाशांना कशा प्रकारे वाचवायचे याचे प्रशिक्षण देण्यात आले आहे.
- अशरफ के. के.,
विभागीय वरिष्ठ सुरक्षा आयुक्त, मध्य रेल्वे

दादर स्थानकात ‘मॉक ड्रिल’

गर्दीच्या वेळी प्रवाशांनी शिस्तीचे पालन करावे, धक्काबुक्की करू नये, यासाठी रेल्वे स्थानकांमध्ये रेल्वे सुरक्षा बल आणि महाराष्ट्र सुरक्षा बल यांना प्रशिक्षण देण्यात आले.
दादर स्थानकात रेल्वे सुरक्षा बल आणि राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद पथक यांच्या वतीने आपत्कालीन घटनेशी लढा देण्यासाठी मॉक ड्रिल करण्यात आले.
राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद पथकाच्या जवानांकडून स्थानकावरील प्रवाशांना कसे वाचवायचे, रुग्णवाहिका, वैद्यकीय उपचार कशा प्रकारे पुरवायचे याची प्रात्यक्षिके दाखविण्यात आली.

Web Title: Special defenses to avoid staging of the stampede, do not repeat Alfonston's repetition

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Mumbaiमुंबई